राजापूर (प्रतिनिधी): शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी शकील इस्माईल काझी वय (६२) यांचे सोमवारी ह्दविकाराच्या तीव्र झटक्याने नवीमुंबई येथे निधन झाले. राजापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष लियाकत काझी यांचे ते कनिष्ठ बंधू होत. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
राजापूर शहरातील बाग काझी येथील रहिवाशी असलेले शकिल काझी हे गेले काही वर्षे मुलांच्या शिक्षण व नोकरी व्यवसायासाठी नवीमुंबईत स्थायिक झाले होते. मात्र तरीही त्यांचा कायमच राजापूरशी संपर्क असे. जवाहर चौकातील त्यांचा लोकमान्य हॉटेल व्यवसायही त्यांनी काही काळ सांभाळला होता. त्यानंतर त्यांनी शहरात आंबा कॅनिंग व्यवसाय सुरू केला होता. बाग काझी जमातुल मुस्लीम कमिटीचे अध्यक्षपदीही त्यांनी काम केले होते. तर गेली कित्येक वर्षे शहरातील बज्मे उर्दु आदब या संस्थेवर ते संचालक म्हणून कार्यरत होते. तर भारतीय आर्युविमा महामंडळाचे विमा प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. राजापुरातील सामाजिक कार्यात त्यांचा कायमच सक्रिय सहभाग असे. एक शांत, संयमी पण तेवढाच स्पष्टवक्ता म्हणून त्यांची ओळख होती.
सोमवारी मध्यरात्री अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले, तात्काळ त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना रूग्णालयात दाखल केले, मात्र तत्पुर्वीच त्यांची प्राणज्योत मालावली होती. त्यांचे पार्थिव सोमवारी सायंकाळी मुंबई येथून राजापुरात आणण्यात येणार आहे. त्यांच्यावर सोमवारी सायंकाळी बागकाझी मोहल्ला कबरस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या प्रश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, लियाकत व अशफाक असे दोन भाऊ, भावजया, पुतणे असा मोठा परिवार आहे.












