चिपळूण : नाम फाउंडेशन याहीवर्षी चिपळूणमध्ये गाळमुक्त अभियान राबवणार आहे, अशी माहिती नामचे समन्वयक यांनी दिली. पुण्यात नाना पाटेकर यांची भेट घेऊन या कामात सक्रिय सहभाग घेण्याची विनंती पाटेकर यांना केली होती. २०२१च्या महापुरानंतर चिपळूण बचाव समितीने शहराच्या पूरव्यवस्थापनासाठी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे प्रशासनाने वाशिष्ठी आणि शिवनदीमध्ये गाळ काढण्यासाठी मोठी यंत्रणा पाठवली त्यासोबतच, फाउंडेशनच्यावतीने गाळमुक्त अभियान राबवण्यासाठी दुसरी यंत्रणा चिपळूणमध्ये पाठवण्यात आली होती.
या अभियानाच्या माध्यमातून वाशिष्ठी आणि शिवनदीचे पात्र रुंद आणि खोल करण्यात आले. परिणामी, २०२१ नंतर सलग तीन वर्ष चिपळूणमध्ये पुराचे पाणी शिरले नाही; मात्र यंदा उशिरा आणि अतिमुसळधार पावसामुळे शहरात वाशिष्ठीचे पाणी शिरले तरी प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे पातळी वाढली नाही. काही ठिकाणी अजून अधिक काम करण्याची गरज आहे.
चिपळूण बचाव समिती आणि प्रशासनाच्या विनंतीनुसार, नाम फाउंडेशन पुन्हा चिपळूणमध्ये गाळमुक्त अभियान राबवणार आहे. अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे संस्थापक पाटेकर म्हणाले, आपण सर्वांनी मिळून चिपळूणमध्ये अधिक काम करूया. या संदर्भात नाम फाउंडेशनचे कोकण समन्वयक समीर जानवलकर, समन्वयक महेंद्र कासेकर आणि देशपांडे यांनी पाटेकर यांची नुकतीच पुण्यात भेट घेतली. सध्या पावसाचा जोर असल्याने सप्टेंबरनंतर पाऊस थांबल्यानंतर या अभियानाची बैठक घेऊन नियोजन करण्यात येणार आहे. गाळाचे नियोजन चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी विशाल भोसले आणि चिपळूण बचाव समितीच्या मार्गदर्शनाखाली केले जाणार आहे.












