सावंतवाडी । प्रतिनिधी : वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिरात सुरू असलेला २१ दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू आहे. गणेशोत्सवातील संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर येथील भाविकांनी मिळून तब्बल ५ हजार १२१ मोदकांचा महाप्रसाद श्रींच्या चरणी अर्पण केला. या अतुलनीय भक्तीमुळे हा दिवस अविस्मरणीय ठरला.
बुधवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त सकाळी पुरोहित गणेश दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांनी सामुदायिक अथर्वशीर्ष पठण केले. त्यानंतर दुपारी भव्य महाआरती पार पडली, ज्यात हजारो मोदकांचा नैवेद्य श्रींना अर्पण करण्यात आला. यावेळी गौरेश मिशाळ यांनी श्रींची विशेष पूजा केली. या गणेशोत्सवादरम्यान रोज विविध धार्मिक कार्यक्रम आणि भजनांचे आयोजन केले जाते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एक सकारात्मक आणि भक्तिपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
या विशेष कार्यक्रमासाठी हनुमान मंदिर उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक म्हापसेकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी नगरसेविका शुभांगी सुकी, अण्णा म्हापसेकर, सुरेश भोगटे, महावीर चेंडके, सुभाष आळवे, धोंडी दळवी, शरद सुकी, महादेव गावडे, मंगेश परब, प्रकाश मिशाळ, प्रकाश सुकी, वैभव म्हापसेकर, नरेश जीवने, डॉ. दादा केसरकर, संजय म्हापसेकर, वैशाख मिशाळ, सतीश नार्वेकर, महेश म्हापसेकर, अंकिता नेवगी, धिरेंद्र म्हापसेकर यांच्यासह वैश्यवाडा भागातील शेकडो रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याबाबत उत्सव समितीने दिलेल्या माहितीनुसार, येत्या मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी श्रींच्या भव्य विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीत ‘देवीचा गोंधळ’ ही खास संकल्पना सादर केली जाणार आहे. यात विविध कला सादर करणारे कलाकार, भजन मंडळी आणि हलगी वादक सहभागी होणार आहेत. उत्सव समितीने सर्व गणेशभक्तांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.












