चिपळूण-गुहागर बायपासवर बावशेवाडी येथे स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण-गुहागर बायपासवरील बावशेवाडी वळण धोकादायक बनले असून अपघातांची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवून अपघातांना आळा घालावा, अशी मागणी महालक्ष्मी मित्र मंडळ, महालक्ष्मीनगर (खेंड बायपास, चिपळूण) यांनी केली आहे. या संदर्भात मंडळाच्या वतीने सा.बां. उपविभाग (रोहयो) चिपळूणचे उपअभियंता यांना लेखी निवेदन देण्यात आले.

मंडळाचे अध्यक्ष यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सदर मागणीवर आम्ही गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करीत आहोत. सहा महिन्यांपूर्वी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करूनही अद्याप स्पीड ब्रेकर बसविण्याची कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.” मंडळाने यापूर्वीही उपअभियंता आणि शाखा अभियंता यांना समस्येविषयी माहिती देऊन वारंवार भेटी दिल्या होत्या. त्यावेळी तांत्रिक कारणास्तव जिल्हाधिकारी व पोलीस विभागाकडून परवानगी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, “सदर परवानगी घेण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असून तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे,” असे निवेदनात नमूद केले आहे. बावशेवाडी येथे रस्त्याला दोन ठिकाणी टी-जॉइंट येतात तसेच वळण असल्याने वाहनांचा वेग वाढल्यास अपघाताची दाट शक्यता आहे. त्यामुळे तातडीने स्पीड ब्रेकर बसविण्याची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत आमदार शेखर निकम यांच्यासह संबंधित लोकप्रतिनिधींना देण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे मागासवर्गीय सेल चिपळूण तालुकाध्यक्ष विशाल जानवलकर, सेवानिवृत्त अभियंता रमेश कादवडकर, नागेश बोंडकर आदी उपस्थित होते.