सावंतवाडीत १७ दिवसांच्या गणरायाला जल्लोषात निरोप

मोती तलावावर गणेशभक्तांची मोठी गर्दी

सावंतवाडी । प्रतिनिधी : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ च्या जयघोषात शहरातील १७ दिवसांच्या गणरायाचे वाजत-गाजत आणि मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक नृत्ये आणि पालखीतून निघालेल्या बाप्पाच्या स्वारीने विसर्जन मिरवणुकीला विशेष शोभा आणली होती. गणेशभक्तांनी मोठ्या जल्लोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

शहरातील देव नरसोबा गणेशोत्सव मंडळ, जुना बाजार आणि भट्टीवाडा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखीतून निघालेली बाप्पाची मिरवणूक हे खास आकर्षण ठरले. वारकरी भजन आणि समई नृत्याने मिरवणुकीत लक्ष वेधून घेतले. तरुण-तरुणी डीजे आणि ढोल पथकांच्या तालावर थिरकत होते, तर महिला व युवकांनी सादर केलेल्या पारंपरिक कार्यक्रमांनी विसर्जन मिरवणुकीची रंगत वाढवली.

अनेक घरगुती गणपतींचे विसर्जनही फटाक्यांच्या आतषबाजीसह मोठ्या थाटामाटात करण्यात आले. संपूर्ण शहर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ च्या जयघोषाने दुमदुमून गेले होते. पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन घेत, जड अंत:करणाने गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप दिला. या विसर्जन सोहळ्यासाठी मोती तलावाच्या काठावर मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते. शांततेत आणि उत्साहात हा सोहळा पार पडला.