सावंतवाडीत पाणीपुरवठा विस्कळीत : नगरसेविका निता सावंत-कविटकर यांची तीव्र नाराजी

सावंतवाडी:सावंतवाडी येथील समाज मंदिर परिसरात गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गॅस पाईपलाईनचे काम सुरू असताना मुख्य जलवाहिनी फुटल्याने हा प्रकार घडला असून, मिळणारे पाणीही अत्यंत गढूळ आणि जंतूयुक्त असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या साऱ्या प्रकाराला नगरपरिषदेचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका अ‍ॅड. निता सावंत-कविटकर यांनी केला आहे.

समाज मंदिर परिसरात सध्या गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या खोदकामादरम्यान मुख्य पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. तसेच पाण्याच्या टाकीजवळील पाईपला गळती लागल्याने दररोज संध्याकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत हजारो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे पाण्याची टाकी पूर्ण भरत नाही आणि पर्यायाने नागरिकांना अत्यंत कमी दाबाने पाणी मिळत आहे. काही भागात तर चार दिवसांपासून थेंबभरही पाणी आलेले नाही.

नगरपरिषदेच्या या ढिसाळ कारभारावर अ‍ॅड. निता सावंत-कविटकर यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, “या समस्येबाबत नगरपालिकेला वारंवार कळवूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. संबंधित कर्मचारी दुपारपर्यंत कामावर हजर राहत नसल्याने दुरुस्तीचे काम रखडले आहे. तसेच शासकीय विश्रामगृहा समोरही पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे, ही खेदाची बाब आहे.”

विस्कळीत पुरवठ्यासोबतच नागरिकांना मिळणारे पाणी जंतूयुक्त आणि मातीमिश्रित (गढूळ) येत आहे. यामुळे परिसरात साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. दैनंदिन कामांसाठी पाणी नसल्याने महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

फुटलेली पाईपलाईन तातडीने दुरुस्त करून नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी अ‍ॅड. सावंत-कविटकर यांनी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.