दयासागर वसतीगृहातील विद्यार्थ्यांना २.३० लाखांचे जीवनावश्यक साहित्य वाटप

योग विद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन सेवाभावी संस्थेचा प्रेरणादायी उपक्रम 

सावंतवाडी । प्रतिनिधी : “मानव सेवा, हीच ईश्वर सेवा” या भावनेतून काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. याचाच प्रत्यय देत मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई या स्वयंसेवी संस्थेने रोणापाल येथील दयासागर वसतीगृहातील अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांना २ लाख ३० हजार रुपये किमतीच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यात वर्षभर पुरेल इतके धान्य आणि इतर किराणा साहित्याचा समावेश आहे.

या संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक मास्टर चोआ कॉक सुई यांच्या नावाने कार्यरत फिरत्या वैद्यकीय पथकाने सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर सह्याद्री पट्ट्यात आरोग्य सेवा पुरवली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सेवाभावी उपक्रम राबवत आहे. याआधी त्यांनी कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील नाग्या महादू कातकरी वसतिगृहालाही मदत केली होती, तसेच एका आयुर्वेद महाविद्यालयाला सुमारे ३.५० लाख रुपयांचे साहित्य दिले होते.

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबईतील या संस्थेला दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात आणले. डॉ. ठाकरे यांच्या माध्यमातूनच ही मदत गरजूंपर्यंत पोहोचत आहे.

यावेळी, एम फॉर सेवा संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या दयासागर वसतिगृहाचे जिवबा वीर यांनी योग विद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबईचे आभार मानले. या कार्यक्रमाला क्रियान्वयन फाउंडेशनच्या डॉ. मुग्धा ठाकरे, डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, जिवबा वीर आणि मंगल कामत आदी मान्यवर उपस्थित होते.