भाजपा सेवा पंधरवड्याचा पेंडूर जिप मतदार संघातून आज होणार शुभारंभ

2 ऑक्टोबर पर्यत विविध कार्यक्रमांचे आयोजन ; भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात ‘सेवा पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. सेवा पंधरवड्यात 2 ऑक्टोबर पर्यत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यांसह केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहितीही पोहोचवली जाईल. तालुक्यात एकूण १२ पंचायत समिती गणांमध्ये संवाद बैठका घेतल्या जाणार आहेत. सेवा पंधरव्याच्या पार्श्वभूमीवर १४ सप्टेंबर रोजी पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघातील दोन पंचायत समिती गणांमधून सुरुवात होईल. तर २० सप्टेंबर रोजी मालवण शहरात संवाद बैठक होईल. अशी माहिती भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली.

हॉटेल महाराजा येथे भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर तालुकाध्यक्ष यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजपा जिल्हा चिटणीस महेंद्र चव्हाण, माजी सभापती अजिंक्य पाताडे, माजी उपसभापती राजू परुळेकर, माजी नगरसेवक मंदार केणी, पंकज सादये, भाई कासवकर, जीवन भोगावकर, शहर उपाध्यक्ष मनोज मेथर, सचिन आंबेरकर, पंकज पेडणेकर, प्रकाश मेस्त्री, रवींद्र टेंबुलकर, प्रमोद करलकर, रोहन पेंडूरकर, कॅलीस फर्नांडिस, प्रदेश सदस्या रश्मी लुडबे, जिल्हा चिटणीस सेजल परब, माजी नगरसेविका पूजा करलकर, भाजपा शहराध्यक्ष अन्वेषा आचरेकर, शहर उपाध्यक्ष वैष्णवी मोंडकर, महिमा मयेकर, दीक्षा गावकर, अमिता निवेकर, समीक्षा खोबरेकर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडाचे नियोजन करण्यात आले. या सेवा पंधरवड्यात भाजप कार्यकर्ते वृक्षारोपण आणि दिव्यांग बांधवांसाठी कार्यक्रम तसेच अन्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाईल असे श्री. चिंदरकर यांनी स्पष्ट केले. आगामी काळात होणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुका भारतीय जनता पार्टीने स्वबळावर लढवाव्यात अशी इच्छा कार्यकर्ते व्यक्त करतं आहेत. याबाबत कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.

पालकमंत्री नितेश राणे यांचा मालवणात जनता दरबार

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार सेवा पंधरवड्या दरम्यान भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक गावात जाऊन सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार. पालकमंत्री नितेश राणे ही लवकरच मालवणचा दौरा करतील. या दौऱ्यात ते जनता दरबार घेऊन नागरिक आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधतील. जनतेच्या समस्या सोडवतील. विकासात्मक कामांचा आढावा घेणार आहेत. असे चिंदरकर यांनी सांगितले.