खेड | प्रतिनिधी :
खेड तालुक्यातील बोरघर, मोहल्ला व चिंचघर, प्रभुवाडी या दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच रात्री दोन महाकाय अजगर साप नागरिकांच्या नजरेस पडले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला असून वनविभागाच्या पथकासह छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशनच्या सदस्यांनी या अजस्त्र अजगरांचा यशस्वी रेस्क्यू करून त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश मिळवले आहे.

ही घटना १५ सप्टेंबर रोजी रात्री घडली. सुमारे रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बोरघर येथील रहिवाशांना सुमारे नऊ फूट लांबीचा महाकाय अजगर आढळून आला. स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी तात्काळ वनविभागाला कळविले. वनविभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली व सावधगिरी बाळगून त्या अजगराला सुरक्षितरीत्या पकडण्यात आले.
याच घटनेनंतर अवघ्या काही तासांत, १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चिंचघर, प्रभुवाडी येथे पुन्हा एकदा स्थानिकांना अजून एक महाकाय अजगर दिसला. या वेळी साप दहा फूट लांबीचा होता. तत्काळ माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले व कौशल्यपूर्णरीत्या त्या अजगराला देखील सुरक्षितरीत्या पकडले. दोन्ही अजगरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यानंतर त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. या रेस्क्यू मोहिमेत छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशनचे सर्वेश पवार, श्वेत चोगले, रोहन खेडेकर, सूरज जाधव व सुमित म्हाप्रळकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांना वनविभागाचे अधिकारी वनपाल उदय भागवत, वनरक्षक परमेश्वर डोईफोडे व अशोक ढाकणे यांनी सहकार्य केले. संपूर्ण कारवाई रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.










