खेडमध्ये नवनिर्माण कला संस्थेचा सांस्कृतिक अविष्कार – स्पर्धांमध्ये रंगला उत्साह

खेड (प्रतिनिधी) :
खेड नगरीच्या सांस्कृतिक वाटचालीत भर घालणारा आणि नवचैतन्य फुलवणारा सोहळा रविवारी सायंकाळी स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रात उत्साहात पार पडला. नवनिर्माण कला संस्थेच्या वतीने आयोजित विविध कला-स्पर्धांमध्ये शहरातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या कलावंतांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रेक्षकांची मनं जिंकली.
श्री गणेश मूर्तिकला स्पर्धेत तरुण कलावंत शिवम सुभाष कदम याने आपल्या कुशल हातांनी साकारलेल्या देखण्या मूर्तीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. लहान वयातही कल्पकतेच्या पंखांवर झेप घेतलेल्या मुस्कान मंगेश खेडेकर हिने उपविजेतेपद मिळवून उपस्थितांची दाद मिळवली. चित्रकला स्पर्धेत समिक्षा बाबाजी गोरे हिने सृजनशीलतेची झळाळी दाखवत पहिला क्रमांक पटकावला. सई शेखर दांडेकर हिला दुसरा, तर अभिज्ञ भानसे याला तिसरा क्रमांक मिळाला.
एकपात्री अभिनय स्पर्धेत मंदार कृष्णा मोरे याने आपल्या प्रभावी सादरीकरणातून रसिकांना भारावून टाकत विजेतेपद मिळवले. शुभम केसकर याने उपविजेतेपद मिळवले तर जितेश गोरे यांनी तृतीय क्रमांकावर नाव कोरले. कराओके गीत गायन स्पर्धेत सात ते साठ वयोगटातील कलाकारांनी रंगतदार सादरीकरण केले. या स्पर्धेत मल्हार देवघरकर प्रथम, अंगद कुमार द्वितीय तर पवन सौंदरे तृतीय क्रमांकावर आला. तसेच स्वराज पाटील आणि पुष्कर आवळे यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले.
या भव्य सोहळ्याला माजी नगराध्यक्ष गौरी पुळेकर, शरद शिर्के, कुंदन सातपुते, अमोल बुटाला, सतीश चिकणे, शमशुद्दीन मुकादम, रोहन विचारे, दीपक नलावडे, उत्तमकुमार जैन, अतुल गोंदकर, सदानंद जंगम आणि किशोर साळवी यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली. स्पर्धांचे परीक्षण संगीत शिक्षक निळकंठ गोखले आणि सांची वानखेडे यांनी केले, तर चित्रकलेचे परीक्षण विनय माळी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू सनगरे यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत केले.
या यशस्वी आयोजनामागे संस्थाध्यक्ष अनुज जोशी, उपाध्यक्ष अंकुश विचारे, सचिव स्वरा जोशी, खजिनदार सिकंदर बांगी, तसेच मंगेश पवार, राजेंद्र खेडेकर, अर्बीना वावघरकर, साक्षी शिंदे, योगिता चव्हाण, संगम चव्हाण, यश चव्हाण, ओम शिंदे, रानडे आणि सर्व संस्थासदस्यांचा मोलाचा सहभाग राहिला.