कणकवली : कणकवली आगरातून १२ रोजी सायंकाळी सुटणाऱ्या जांभवडे बसच्या वाहकाने विद्यार्थ्यांना जादा तिकीट दिले तसेच शिवीगाळ केल्याप्रकरणी संबंधित वाहकाला निलंबित करण्यात आले आहे. आगार स्तरावरून सदरची कारवाई करण्यात आली असल्याचे रा. प. महामंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. संबंधित वाहकाने जादा तिकीट देण्यासोबतच तो मद्यपान केलेल्या स्थितीत होता, असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. त्यानुसार, वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली होती. तसेच रक्त नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. दरम्यान, या वाहकाने जादा तिकीट घेतल्याची कबुलीही दिली होती. भाजप पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी आगार व्यवस्थापकांना घेराव घालत कारवाई न झाल्यास गप्प न बसण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, या प्रकरणी प्राथमिक चौकशीअंती या वाहकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.











