त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; गुंडांवर कठोर कारवाईचे आदेश – गृहराज्यमंत्री योगेश कदम

दापोली (राकेश कोळी) – त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी आलेल्या नाशिकमधील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांवर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी अमानुष हल्ला चढवला. या मारहाणीत झी 24 तासचे ब्युरो प्रमुख योगेश खरे, साम टीव्हीचे अभिजीत सोनवणे आणि पुढारी न्यूजचे किरण ताजणे गंभीर जखमी झाले. विशेषतः किरण ताजणे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती समजताच महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी तातडीने जखमी पत्रकारांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. त्यांनी जखमी पत्रकारांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक सूचना दिल्या.
यानंतर गृहराज्यमंत्री कदम यांनी नाशिकचे पोलीस अधीक्षक (SP) यांना थेट आदेश देत या घटनेत सहभागी गुंडांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. पत्रकारांवरील हल्ले अजिबात सहन केले जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.
पत्रकार हे समाजाचे प्रश्न, समस्या आणि आवाज जनतेपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा लोकशाहीच्या सुरक्षिततेशी निगडीत असल्याचे सांगत कदम यांनी हल्ले म्हणजे लोकशाहीवर थेट आघात असल्याचे स्पष्ट केले. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासन गंभीर असून, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केली जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.