गुहागर | प्रतिनिधी
तालुक्यातील विसापूर गावचे रहिवासी व सर्वांना आपुलकीने जोडून ठेवणारे कार्यकर्ते राहुल रमाकांत भागवत (वय ५०) यांचे नुकतेच निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठ दिवस उपचार सुरू असतानाही प्रकृती सुधारली नाही आणि अखेर त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राहुल भागवत हे गणित विषयात पारंगत होते. चिपळूण येथील डिबीजे महाविद्यालयातून पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी शहरात न थांबता गावी परत येऊन शेतीला प्राधान्य दिले. शेतीबरोबरच त्यांनी आंबा कॅनिंग, कृषी अवजारे विक्री व दुरुस्ती असा व्यवसाय सुरू करून गावातील शेतकरी व तरुणांसाठी नवे मार्ग खुले केले.
कनिष्ठ महाविद्यालयात असताना ते शाखेत जाऊ लागले. संघात मिळेल ती जबाबदारी पार पाडू लागले. संघ कार्यकर्ता म्हणून त्यांनी धर्मजागरण गतिविधीत काम केले तसेच अनुलोम मित्र म्हणून जबाबदारी पार पाडली. समाजजीवनात त्यांनी विविध भूमिका निभावल्या. विसापूर ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, ग्रामदैवत देवस्थान कमिटीचे सहसचिव, तसेच शिवशक्ती नाट्य मंडळाचे सचिव म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले.
शांत, संयमी, सेवाभावी आणि सर्वांना आपलेसे करणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अचानक जाण्याने गावात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, भाऊजय, पुतण्या व आई असा परिवार आहे.










