सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना निवेदन
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग नाभिक भवन उभारणीसाठी शासकीय जमीन उपलब्ध करून मिळावी. अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे करण्यात आली आहे.याबाबत निवेदन पत्र जिल्हा अध्यक्ष जगदीश चव्हाण यांनी राज्य संघटक विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांना सादर केले. यावेळी मालवण तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण, प्रतिभा चव्हाण यासह सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हा कार्यकारणी उपस्थित होती. अशी माहिती जगदीश चव्हाण यांनी दिली.
दिलेल्या निवेदन पत्रात म्हटले आहे, सिंधुदुर्ग नाभिक संघटना ही १९९१ पासून सिंधुदुर्ग जिल्हयात समाज विकासासाठी कार्यरत असून अनेक विविध कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून पार पाडले जातात. दरवर्षी सेना महाराज जयंती,पुण्यतिथी, शालेय मुलांच्या स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम, नाभिक बंधू आणि भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात साजरे करण्यात येतात.म्हणुन सिंधुदुर्ग नाभिक समाजाला हक्काचे व्यासपीठ असावे, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक दालन निर्माण व्हावे अशी समस्त नाभिक समाजाची प्राथमिक मागणी आहे.
सिंधुदुर्ग नाभिक भवन हे नाभिक कौशल्यकेंद्र या रुपाने साकारणार असून यात बहुउद्देशीय हॉल, वाचनालय, कलाकृती दालन, निवारा व्यवस्था, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमासाठी दालन, श्री संत सेना महाराजाचा आकर्षक पुतळा अशा विविध सुविधा असणार आहेत. यासाठी समाजाचे भवन बांधण्यासाठी शासकिय जमिन उपलब्ध करुन दयाल अशी आशा आहे. नाभिक भवनाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आपले सहकार्य खूप मोलाचे आहे.सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना याबाबत दिलेल्या निवेदनाची दखलपत्र सोबत जोडत आहोत. आमच्या मागणीचा विचार व्हावा. असे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.









