बांधवांनो, संकट दारापर्यंत आले आहे ! – वेदमूर्ती भूषण जोशी

वेंगुर्ले येथील सनातनचा गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न !

वेंगुर्ला : प्रतिनिधी : ‘इंस्टाग्राम’ या सामाजिक माध्यमावर झालेल्या मैत्रीवरून दिल्ली येथील एक अल्पवयीन मुलगी वेंगुर्ला शहरातील मुसलमान मित्राकडे येते. सिंधुदुर्गातील डिगस सारख्या एका गावात १०६ बांगलादेशींनी नावनोंदणी शासकीय योजनेसाठी केल्याचे वृत्त येते. या सर्व घटना विचार करायला लावणाऱ्या आहेत. बांधवांनो, संकट आता आपल्या दारापर्यंत आले आहे. राष्ट्रविरोधी आणि धर्मविरोधी अशा घटना रोखण्यासाठी आज आपण संकल्प करूया. किमान एकाला तरी मी याविषयी जागृत करीन, असा निश्चय करूया, असे आवाहन वेदमूर्ती भूषण जोशी यांनी वेंगुर्ला येथे आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात केले. वेंगुर्ले येथील सनातनचा हा गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

वेंगुर्ले येथील साई दरबार सभागृहात सनातन संस्था सिंधुदुर्ग च्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचा लाभ मोठ्या संख्येने उपस्थित जिज्ञासू आणि साधक यांनी घेतला. या मंगलदिनी सकाळी श्री. भूषण जोशी यांच्या पौरोहित्य खाली श्री. स्वप्नेश ठाकूर आणि सौ. श्रावणी ठाकूर यांनी कार्यक्रमस्थळी गुरुपुजन केले. सच्चिदानंद परब्रम्ह डॉक्टर आठवले यांच्या गुरुपौर्णिमेनिमित्तच्या शुभसंदेशाचे येथील साधक महेश जुवलेकर यांनी वाचन केले.

वेदमूर्ती जोशी पुढे म्हणाले, “गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र ‘महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या अधिवेशनाला देशाच्या कानाकोपऱ्यांतून हिंदु धर्मासाठी कार्य करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी आले होते. मला तेथे जाण्याची संधी मिळाली. तेथील सर्वांचे अनुभव आणि मार्गदर्शन पाहून आपण काहीच करत नाही, असे मला वाटले. चांगले नियोजन आणि योग्य मार्गदर्शन तेथे अनुभवायला मिळाले.”असे सांगितले. तर ‘संविधानिक आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राचा संकल्प करा !’ या विषयावर उपस्थित जिज्ञासूंना श्री. भरत राऊळ यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ. श्रद्धा जुवलेकर यांनी मानले.