राजापूर अर्बन बँकेची आर्थिक स्थिती स्थिर व सभासदांच्या ठेवीही सुरक्षित- अध्यक्ष संजय ओगले

बँकेचे कामकाज पारदर्शक व जबाबदार बँकिंग पध्दतीने सुरू
विघ्नहर्ता ठेव योजनेलाही सभासदांचा उस्फुर्त प्रतिसाद

राजापूर प्रतिनिधी राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरी शाखेत रत्नागिरी शाखेतील शाखा व्यवस्थापकाकडून काही संशयास्पद व्यवहार झाल्याने बाजारामध्ये बँकेच्या विश्वासार्हतेला काही प्रमाणात तडा गेल्याने बँकेच्या ठेवीमध्ये घट झालेली आहे. मात्र बँकेची आर्थिक स्थिती स्थिर असून ठेवीदारांच्या रकमेची संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित केलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमक सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन बँकेचे कामकाज पारदर्शक व जबाबदार बँकिंग पध्दतीने सुरू असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष संजय ओगले यानी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.
बँकेने गणेशोत्सव काळात सुरू केलेल्या विघ्नहर्ता ठेव योजनेलाही सभासदांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून आतापर्यंत ६ कोटी १३ लाख इतक्या ठेवी या योजनेंतर्गत गोळा करण्यात आल्याचे ओगले यांनी सांगितले.
राजापूर अर्बन बँकेची १०४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी २८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर बँकेच्या सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील प्रगतीबाबत माहिती देण्यासाठी बँकेच्या राजापूर शाखेतील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओगले यांनी बँकेच्या एकूणच कामकाजाची माहिती दिली.
राजापूर अर्बन बँक ही १०४ वर्षे उज्वल परंपरा लाभलेली अग्रगण्य सहकारी संस्था असून सन २०२४-२५ मध्ये बँकेला काही आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. मार्च २०२५ मध्ये बँकेच्या ठेवी ५२३ कोटी इतक्या होत्या. मात्र रत्नागिरी शाखेतील शाखा व्यवस्थापकांकडून काही संशयास्पद व्यवहार झाल्याने बाजारामध्ये बँकेच्या विश्वासार्हतेला काही प्रमाणात तडा गेल्याने बँकेच्या आज अखेर ठेवीमध्ये काही प्रमाणात घट झालेली आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या लेखापरिक्षणामध्ये लेखा परिक्षणांकडून बँकेला ड वर्ग लेखापरिक्षण दर्जा देण्यात आला होता. मात्र याबाबत बँकेने तत्काळ आवश्यक ती सुधारणा करुन आणि योग्य ते पुरावे सादर करुन सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे अपिल केले होते. दिनांक सप्टेंबर २०२५ रोजी सहकार आयुक्तांनी वैधानिक लेखापरीक्षक यांनी दिलेला “ड” वर्ग बदलून बँकेला “ब” वर्ग दिला आहे.
या आव्हानात्मक परिस्थिती दरम्यान अचानकपणे पसरलेल्या अफवांमुळे काही प्रमाणात ठेवीदारांनी मोठया प्रमाणावर आपल्या ठेवींची रक्कम काढली असून सुमारे १०० कोटी इतकी ठेवींमध्ये घट झालेली असल्याचे ओगले यांनी सांगितले. तरीसुध्दा बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या परिश्रमामुळे तसेच ठेवीदार व सभासद यांच्या सहकार्यामुळे आज बँक स्थिर अवस्थेत आहे. १०४ वर्षाची परंपरा, सभासद व ठेवीदारांचा विश्वास व ग्राहकांशी नाळ जोडलेली अशी राजापूर अर्बन बँक आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती स्थिर आहे. ठेवीदारांच्या रकमेची संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित केलेली आहे. नियमक सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन पारदर्शक व जबाबदार बँकिंग सेवा सुरु असल्याचेही ओगले यांनी सांगितले.
या काळात बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंतक यांचे सहकार्य, विश्वास आणि पाठबळ अधिक गरजेचे आहे. आपले सामुहिक समर्थन या १०४ वर्षाच्या संस्थेला आणखी बळ देईल व भविष्यातील प्रवास अधिक सक्षम करेल असा विश्वासही ओगले यांनी व्यक्त केला.
गेली अनेक वर्षे बँक आपल्या सभासदांना १०% लाभांश देत होती. मात्र यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडे प्रस्ताव सादर केला असून त्यांच्या परवानगीशिवाय यावर्षी लाभांश जाहीर करता येणार नाही असेही ओगले यांनी सांगितले.
आपला विश्वास हीच आमची संपत्ती या ब्रीदवाक्यानुसार राजापूर अर्बन बँक नवनवीन सेवा व योजनांद्वारे सभासद व ठेवीदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी कटीबध्द आहोत. याची प्रचिती विघ्नहर्ता ठेव योजनेमध्ये आली आहे. ही ठेव योजना दिनांक १६ ऑगस्ट २०२५ पासून सुरु करण्यात आली असून यामध्ये आतापर्यंत ६ कोटी १३ लाख इतक्या ठेवी गोळा करण्यात यश आले आहे.
याप्रसंगी बँकेचे मॅनेजमेंट बोर्डचे अध्यक्ष एड. शशिकांत सुतार, बँकेचे उपाध्यक्ष विजय पाध्ये, संचालक जयंत अभ्यंकर, किशोर जाधव, विवेक गादीकर, प्रसाद मोहरकर, सौ. प्रतिभा रेडीज, बँकेचे अधिकारी रमेश काळे, लक्ष्तण म्हात्रे, रोहित सामंत आदी उपस्थित होते.