एकात्म मानव दर्शन हे सर्वांगीण विकासाचे तत्त्वज्ञान – प्रा. डॉ. बालाजी सुरवसे

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — “पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेले ‘एकात्म मानव दर्शन’ हे केवळ तत्त्वज्ञान नसून भारतीय जीवनशैलीचे शास्त्रशुद्ध अधिष्ठान आहे. आजच्या संघर्षमय, विषमताग्रस्त व भोगवादी जगात या विचारसरणीचा स्वीकार हा मानवतेसाठी अंतिम उपाय ठरू शकतो,” असे प्रतिपादन कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांनी केले.

 

महाविद्यालयात एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. डॉ. सुरवसे यांनी आपल्या भाषणात सविस्तरपणे एकात्म मानव दर्शनाचे तात्त्विक आणि व्यावहारिक पैलू स्पष्ट केले. ते म्हणाले की, “आज पाश्चात्य जीवनशैलीचा भारतीय समाजावर प्रचंड प्रभाव दिसून येतो. भोगवाद, चंगळवाद आणि अति फायद्याच्या लालसेमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. जीवनशैली अस्थिर होत आहे. मात्र भारतीय संस्कृती ही परस्परपूरकता व परस्परावलंबनावर आधारित आहे. तिचे ध्येय नेहमीच ‘सर्वजनहिताय, सर्वजनसुखाय’ असे राहिले आहे.हिंदू संस्कृतीतील चार पुरुषार्थांवर (धर्म, अर्थ, काम व मोक्ष) भाष्य करताना त्यांनी सांगितले की, “धर्माशिवाय अर्थ व काम हे भरकटतात आणि मोक्ष प्राप्त करणे अशक्य होते. एकात्म मानव दर्शन या चारही पुरुषार्थांचा समन्वय साधून मानवी जीवनाला संतुलित दिशा देते.”

 

 

जागतिक पातळीवर वाढत चाललेले शोषण, अन्याय, विषमता, सत्तालालसा, विद्यालालसा आणि संघर्ष यामुळे संपूर्ण जग अस्थिर बनले आहे. तंत्रज्ञान प्रगत झाले तरी मानवी जीवनात समाधान व शांती नाही. या पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृतीचा ‘मानवकेंद्रित व प्रकृतिसहजीवनाचा’ विचार हा शाश्वत मार्ग ठरतो. “एकात्म मानव दर्शन हे मानवाच्या सर्वांगीण विकासाचे आणि जगात शाश्वत शांतता निर्माण करण्याचे कालजयी तत्त्वज्ञान आहे,” असेही डॉ. सुरवसे यांनी ठामपणे सांगितले.

 

 

 

यावेळी फोंडाघाट आयटीआयचे प्राचार्य भूषण सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “भारतीय जीवनमूल्यांचा अंगीकार करून आपण स्वावलंबी व जबाबदार नागरिक बनले पाहिजे,” असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाची सुरुवात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या प्रसंगी संस्थेमधील गट निदेशक ए.के.शिरोडकर , शिल्प निदेशक एस.एस.मेस्त्री, जी.ए.मराठे, बी.पी.पाटील तसेच वरिष्ठ लिपिक श्रीमती.एस.आर.शार्दुल , कनिष्ठ लिपीक एल.जी.असोलकर,भंडारपाल राहुल पाटील , आय.एम.सी लिपीक एम.डी.पराडकर तसेच चतुर्थ कर्मचारी एस.एस.आचरेकर , आर.जी.इस्वलकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिल्प निदेशक ए.आर.जोशी यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार शिल्प निदेशक एस.विश्वांभरे यांनी केले. या कार्यक्रमाला फोंडाघाट आयटीआयमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते….