अपघातास कारणीभूत प्रकरणी विनय आळवे यांची निर्दोष मुक्तता

ओरोस । प्रतिनिधी : हयगयीने आणि अविचाराने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याच्या आरोपातून विनय मंगेश आळवे (रा. कांबळेवीर, ता. वेंगर्ला) यांची मे. चिफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजता ही घटना घडली होती. श्रीकृष्ण हरेश सावंत (वय २९ वर्षे, रा. ओरोस खुर्द डोंगरेवाडी) हे त्यांची पॅशन प्रो मोटारसायकल (क्र. एम एच -०७-१२३६) घेऊन ओरोस खुर्द येथून गजानन हॉटेल ओरोस येथे जात होते. ते ओरोस कोको हॉटेलच्या पुढे आले असता, त्याच रस्त्यावरुन समोरील बाजूने, एकेरी मार्ग असूनही विरुद्ध दिशेने येत असलेल्या एका गोल्डन रंगाच्या वॅगनार गाडीने (चालक विनय आळवे असल्याचे म्हटले जात होते) सकाळी ०८.५० वाजता श्री. सावंत यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

या धडकेत श्रीकृष्ण हरेश सावंत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच मोटारसायकलचेही मोठे नुकसान झाले. जमावाने त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालय ओरोस येथे दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना गोवा बांबुळी येथे हलवण्यात आले होते. या अपघाताप्रकरणी आळवे यांच्याविरुद्ध ओरोस येथील न्यायालयात गुन्हा दाखल होऊन दोषारोपपत्र ठेवण्यात आले होते.

सदर केसमध्ये न्यायालयात साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणीदरम्यान, संशयित आरोपी विनय आळवे यांच्या ओळखीबाबत पुरेसा पुरावा सादर होऊ शकला नाही. तसेच, कोर्टाने तपासलेल्या साक्षीदारांच्या जबाबांमध्येही विसंगती आढळली. ही बाजू लक्षात घेऊन, मे. कोर्टाने आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरला आणि सबळ पुराव्याच्या अभावी विनय मंगेश आळवे यांची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय दिला.

संशयित आरोपीतर्फे अ‍ॅड. अनिल कृष्णा निरवडेकर, अ‍ॅड. गणेश प्रकाश चव्हाण, अ‍ॅड. दत्तप्रसाद विभास ठाकूर, अ‍ॅड. प्रितेश गवस आणि अ‍ॅड. केतन जाधव यांनी न्यायालयात यशस्वीरीत्या बाजू मांडली.