space sector : भारताचे १४० स्टार्टअप्स अंतराळ क्षेत्रात कार्यरत

अमेरिकी वृत्तपत्रांकडून भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमांचे कौतुक

नवी दिल्ली : भारत अंतराळ संशोधन क्षेत्रात (space sector) दिवसेंदिवस नेत्रदीपक कामगिरी करत आहे. याचा प्रत्यय नुकताच एका सर्वेक्षणातून समोर आला आहे. कोरोनाकाळापूर्वी भारतात अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करणारे फक्त ५ स्टारटप्स होते. पण अवघ्या दोन-अडीच वर्षांनंतर आता भारतात अंतराळ तंत्रज्ञानावर १४० नोंदणीकृत स्टार्टअप कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अंतराळ तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्र भांडवल गुंतवणूकदारांसाठी भारतात सर्वात अधिक मागणीच्या क्षेत्रांपैकी एक आहे.

अमेरिकेतील प्रतिष्ठित वर्तमानपत्र द न्यूयॉर्क टाइम्सने भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे कौतुक केले आहे. भारतात सद्यस्थितीत १४० स्टार्टअप कंपन्या आहेत. त्यामुळे भारत लवकरच चीनशी तगडे आव्हान देईल, असे या लेखात म्हटले आहे. भारताने जेव्हा सन १९६३ मध्ये पहिल्यांदा रॉकेट लाँच केले होते, तेव्हा भारत जगभरातील सर्वांत मागासलेला आणि गरीब देश होता. रॉकेटला सायकलवरून लाँच पॅडपर्यंत नेले गेले होते. मात्र आता भारताने अंतराळ संशोधन कार्यक्रमात बरीच प्रगती साध्य केली आहे. ‘द सरप्रायझिंग स्ट्रायव्हर इन द वर्ल्ड्‌स स्पेस बिझनेस’ या लेखात त्यांनी भारताचे कौतूक केले आहे.

भारताने पहिल्यांदा १९६३ मध्ये अग्निबाण प्रक्षेपण केले

१९६३ मध्ये भारताने पहिल्यांदा अग्निबाण प्रक्षेपण केले होते. त्यानंतर रशिया आणि अमेरिकेला टक्कर देत भारत आता अंतराळ संशोधन क्षेत्रातील एक प्रमुख देश म्हणून पुढे आला आहे. किफायतशीर अंतराळ तंत्रज्ञान निर्माण करणे हे भारतीय शास्त्रज्ञांचे मोठे यश आहे. आज जगातील बहुतांश देश उपग्रह प्रक्षेपणासाठी भारताची मदत घेतात.

आत्तापर्यंत अंतराळ संशोधन क्षेत्रातील कार्य सरकारी सहकार्यानेच झाल्याचे दिसून येत होते. मात्र गेल्या दोन वर्षांत १०० हून अधिक अंतराळ क्षेत्राशी निगडीत स्टार्टअप्स पुढे आल्यामुळे खाजगी क्षेत्रातही हे संशोधन मोठ्या प्रमाणावर होऊ घातल्याचे आणि गुंतवणूकदारांकडूनही या उपक्रमांना चांगला पाठींबा मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अंतराळ स्टार्टअप क्षेत्रात नव्या गुंतवणुकीत सुमारे ९८० कोटींची भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी याच महिन्यात भारतीय अंतराळ क्षेत्र खुले केल्यापासून सुमारे १०० हून अधिक स्टार्टअप्सनी इस्रोकडे नोंदणी केली आहे; त्यापैकी काही स्टार्टअप अंतराळातील कचऱ्याच्या व्यवस्थापनाशी संबंधित प्रकल्पांवर काम करत आहेत. तर इतर स्टार्ट-अप प्रस्ताव नॅनो-सॅटेलाइट, प्रक्षेपण वाहन, ग्राउंड सिस्टम, संशोधनाशी निगडित असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

देशबांधणीत महत्वाचे योगदान

भारतीय अवकाश अभियानाची सुरुवात झाल्यापासून, अवकाश-आधारित उपकरणांचे देशबांधणीत महत्वाचे योगदान राहिले आहे. अत्यंत महत्वाच्या सेवा, मग ते दूरसंचार असो, हवामान असो किंवा स्त्रोतांवर देखरेख ठेवणे, दिशादर्शन अशा सगळ्या क्षेत्रात अवकाशीय उपकरणांचा मोठा उपयोग झाला आहे. मात्र, आज सतत वाढत जाणारी अवकाशीय वस्तूंची संख्या, ज्यात कार्यरत उपग्रह आणि अवकाशातील कचरा यामुळे, टक्कर होण्याचे धोके, बाह्य अवकाशाच्या सुरक्षित आणि शाश्वत वापरासाठी गंभीर धोका निर्माण करतात. पृथ्वीच्या कक्षेतील वाढत्या गर्दीमुळे मोठ्या ढिगाऱ्यांमध्ये टक्कर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यातून एकापाठोपाठ एक अशी टक्कर होण्याची मालिकाच सुरू होऊ शकते, ज्याला केसलर सिंड्रोम म्हणून ओळखले जाते. यामुळे अवकाशात जमा असलेल्या कचऱ्याची घनता अधिक तीव्रपणे वाढू शकते. ज्यामुळे, पुढच्या पिढ्यांना बाह्य अवकाशात प्रवेश करणेच दुरापास्त होईल.

रशियाचा अंतराळ संशोधन कार्यक्रम बंद

अमेरिकेच्या मते, अंतराळ संशोधन कार्यक्रमात लवकरच भारत चीनला आव्हान देईल. रशिया आणि चीनने कमी खर्चात रॉकेट लाँच करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र युक्रेन युद्धामुळे रशियाचा अंतराळ संशोधन कार्यक्रम ठप्प आहे. यामुळे ब्रिटनच्या ‘वनवेब’चेही २३ कोटी अमेरिकी डॉलरचे नुकसान झाले. त्यानंतर ‘वनबेव’ इस्रोकडे पाठवले गेले असता त्यांनी १२ कोटी डॉलर जमवले.