खेड : कोकण रेल्वे मार्गावर धावणारी सीएसएमटी मुंबई-मडगाव ‘वंदे भारत’ (Vande Bharat) ही प्रीमियम एक्स्प्रेस प्रवाशांच्या पसंतीला उतरली असून ही गाडी सध्या हाऊस फुल्ल धावत आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवातील ५ दिवसांचे ११० टक्के आगाऊ आरक्षण झाले आहे. यामुळे गणेशभक्तांना प्रतीक्षा यादीवरील तिकिटे घ्यावी लागली आहेत. या पाठोपाठच १५ ऑगस्ट रोजी धावणारी मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस दीड महिना आधीच फुल्ल झाली आहे. जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेकांनी या गाडीला पसंती दर्शवली असल्याने सुमारे २००हून अधिक प्रवासी प्रतीक्षा यादीवर असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनापूर्वीच गणेशोत्सवातील ४ दिवसांचे आरक्षण फुल्ल झाले होते. सद्यस्थितीत गणेशोत्सवातील १५ ते २० सप्टेंबरपर्यंत वंदे भारत एक्स्प्रेसचे ११० टक्के आरक्षण झाले आहे. पाचही दिवसांचे कन्फर्म आरक्षण मिळणे बंद झाल्याने प्रवाशांनी प्रतीक्षा यादीवरील तिकिटे घेतली आहेत.
गणेशोत्सवात धावणाऱ्या नियमित गाड्यांसह गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण काही मिनिटातच फुल्ल होत असल्याने आरक्षित तिकिटांसाठी तासनतास रांगेत उभे राहूनही चाकरमान्यांच्या पदरी निराशाच पडते. या पार्श्वभूमीवर वंदे भारत एक्स्प्रेसचा उत्तम पर्याय उपलब्ध झाल्याने महागडा प्रवास असूनही सर्वाधिक पसंती मिळाल्याचे दिसत आहे. गणेशोत्सवातील ५ दिवसांचे आरक्षण फुल्ल झालेले असतानाच १५ ऑगस्टला धावणारी २२२३० क्रमांकाची मडगाव- सीएसएमटी मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसही दीड महिना आधीच हाऊसफुल्ल होऊन नवा विक्रमच प्रस्थापित झाला आहे.
स्वातंत्र्यदिनासह १६ ऑगस्ट रोजी पारशी दिनाची सुट्टी आहे. या सलग सुट्ट्यांचा पर्यटकांनी पुरेपूर फायदा उठवला आहे. याचमुळे १५ ऑगस्ट रोजी मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस फुल्ल झाली आहे.
गणेशोत्सव काळात कोकण रेल्वेच्या २०८ विशेष रेल्वेगाड्या
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता कोकण रेल्वे मार्गावर आणखी ५२ विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. दिवा-चिपळूण आणि मुंबई-मंगळुरू मार्गावर या विशेष १६ रेल्वेगाड्या धावणार आहेत. यामुळे उत्सवकाळात धावणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांची एकूण संख्या २०८ वर पोहोचली आहे. या निर्णयामुळे गणेशोत्सव काळात कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होईल.