देवाचेगोठणेत चक्रीवादळाचा तडाखा

आंब्याचे झाड कोसळून घरांचे नुकसान

राजापूर (वार्ताहर): गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात वादळी वाऱ्यासह संततधार पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील देवाचे गोठणे येथील राघववाडी येथील ग्रामस्थ समीर तिर्लोटकर व भगवान तिर्लोटकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून नुकसान झाले आहे. राजापूर तालुक्यात शुक्रवारी 99.87 मिमी सरासरी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राजापूर तालुक्यात सर्वत्र संततधार पाऊस पडत आहे. शुक्रवारीही पावसाने संततधार धरली आहे.
तालुक्यात देवाचे गोठणे परिसरात गुरूवारी सांयकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान झालेल्या चक्रीवादळात राघववाडी येथील समीर तिर्लोटकर व भगवान तिर्लोटकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यात छप्परावरचे पत्रे उडून गेले आहेत. तर भिंतीही ढासळल्या आहेत.
याबाबतची माहिती मिळताच कुणबी पतपेढीचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते अविनाश नवाळे व ग्रामसेवक श्री. राऊतयांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. शासन स्तरावरून या दुघटनेत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शासन स्तरावरून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
शुक्रवारी राजापूर तालुक्यात शुक्रवारी एकुण 799 मिमी सरासरी 99.87 मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये राजापूर मंडळ 110 मिमी, ओणी मंडळ 89 मिमी, कुंभवडे मंडळ 79 मिमी, नाटे मंडळ 130 मिमी, जैतापूर मंडळ 136 मिमी, कोंडये तर्फे सौंदळ 73 मिमी, पाचल मंडळ 98 मिमी, सौंदळ मंडळ 84 मिमी असा एकूण पाऊस. 799 मिमी सरासरी 99.87 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. चालु हंगामात शुक्रवार अखेर 6432 मिमी सरासरी 804 मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.