वेंगुर्ले l प्रतिनिधी :नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तुळसच्या वतीने आयोजित श्री दुर्गामाता दौड तुळस २०२५ प्रचंड उत्साहात पार पडली. गावातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याचा संगम साधणाऱ्या या दौडीचे हे दुसरे वर्ष होते आणि ती तुळस गावाच्या नवरात्रोत्सवाचे खास वैशिष्ट्य बनली आहे.
या वर्षीच्या दौडीचे मुख्य आकर्षण म्हणजे कणकवली येथील ससा योद्धा १+ पथक, बिडवाडी यांनी सादर केलेले चित्तथरारक शिवकालीन मर्दानी खेळ. लाठी-काठी आणि तलवारबाजीची प्रात्यक्षिके पाहून उपस्थितांनी दाद दिली.
या यशस्वी आयोजनामागे पोलिस प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्यांनी केलेल्या उत्तम सुरक्षा व्यवस्थेमुळे आणि वाहतूक व्यवस्थापनामुळे दौड अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. पावसामुळे कोणताही अडथळा आला नाही याची काळजी घेत, दौड सुरक्षेवर बारकाईने लक्ष ठेवले गेले. आयोजक समितीच्या काटेकोर नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या दौडीला प्रचंड प्रतिसाद दिला, ज्यामुळे या धार्मिक उपक्रमाला एक सामाजिक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. हा उत्साह असाच कायम राहील, ही आशा आहे.











