ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूलच्या विद्यार्थिनींचा तालुकास्तरीय फोक डान्स स्पर्धेत चमकदार विजय

खेड (प्रतिनिधी) – एलटीटी इंग्लिश मीडिअम स्कूल, खेड या प्रशालेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय फोक डान्स स्पर्धेत ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूल, मोरवंडे-बोरज येथील विद्यार्थिनींनी आपली नृत्यकला सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत विद्यार्थिनींनी गोवा राज्यातील प्रसिद्ध दिवली फोक डान्स प्रकार आकर्षक पद्धतीने सादर केला. डोक्यावर समई ठेवून अवघड असा बॅलेन्स साधत तब्बल सहा मिनिटे विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. त्यांच्या कलेने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. या विजयी पथकात इयत्ता अकरावीतील कु. स्वरा काणेकर, परिणिता मोरे, भूमी गुहागरकर, प्रथा आंब्रे, अनुष्का गमरे, सानवी धाडवे, निधी वाजे, मयुरी मोरे व तन्मयी मोहिते या विद्यार्थिनींचा समावेश होता. दरम्यान, सोलो डान्स प्रकारातही ज्ञानदीप विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आपली कला दाखवली. पाचवी ते सातवी गटात कु. तनिषा मुनघाटे हिने तृतीय क्रमांक मिळविला तर आठवी ते बारावी गटात कु. स्वरा पंदेरे हिने तृतीय क्रमांक पटकावला. या सर्व विद्यार्थिनींना डान्स शिक्षक अमित दिवाळे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मेहनतीमुळे आणि विद्यार्थिनींच्या समर्पित परिश्रमामुळे हे यश शक्य झाले.