देवगड / प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी येथील गोखले एसटी स्टॉपनजीक एसटीची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वारासह दुचाकीवरील तिघेजण जखमी झाले. सुमित गोपाळ पाळेकर (३६), हर्षद समीर पाळेकर (१३) व दुवेश सुमित पाळेकर (९, सर्व रा. पाळेकरवाडी) अशी जखमींची नावे असून सुमित पाळेकर याच्या डोळ्यास गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात २७ सप्टेंबर रोजी दुपारी २.१५ वा. च्या सुमारास घडला. या अपघाताची नोंद विजयदुर्ग पोलीस स्थानकात करण्यात आली असून एसटी चालक पवन प्रभाकर मगर (३६, रा. विजयदुर्ग) या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजयदुर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाळेकरवाडी येथील श्री भूतनाथ मंदिर येथे नवरात्र उत्सवानिमित्त २७ रोजी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी तेथील सुमित पाळेकर हे स्वतः, त्यांचा मुलगा दुवेश व त्याचा पुतण्या हर्षद हे गेले होते. दुपारी महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर ते दुचाकीने घरी परतत असताना पाळेकरवाडी गोखले स्टॉपनजीक पाचल ते विजयदुर्ग (व्हाया मणचे- पाळेकरवाडी- मुटाट) या एसटी बसची धडक त्यांच्या दुचाकीला बसली. या अपघातात सुमितच्या डाव्या डोळ्यास गंभीर दुखापत झाली. तर हर्षद पाळेकर व दुवेश पाळेकर यांना किरकोळ दुखापत झाली. जखमींना तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी विजय विष्णू पाळेकर यांनी विजयदुर्ग पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. घटनेचा तपास विजयदुर्ग पोलीस करीत आहेत.











