दोनशेपेक्षा अधिक गडकिल्ले सर करणारा दुर्गवीर राजापुरातील पडवेचे सुपूत्र प्रथमेश वालम

राजापूर (प्रतिनिधी): रखरखते ऊन, वेगाने वाहणारा सोसाट्याचा वारा, त्यातून निर्माण झालेल्या प्रतिकूल स्थितीशी दोन हात करीत जमिनीपासून सुमारे चारशे ते साडेचारशे फूट उंचीचे अन सुळक्यासारखे उभे असलेले सुमारे दोनशेहून अधिक गडकिल्ले तालुक्यातील पडवेचे सुपूत्र प्रथमेश वालम यांनी सर केले आहेत. मानसिक आणि शारीरीक क्षमतेची जणू काही अग्नीपरिक्षा पाहणाऱ्या या मोहिमा प्रथमेश यांनी केवळ जिद्द आणि स्वतःच्या क्षमतेवरील दृढ विश्‍वासाच्या बळावर सर केल्या असून दुर्गवीर प्रथमेश सर्वस्तरातून विशेष कौतुक केले जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळयांनी बांधलेल्या अनेक अभेद्य असे किल्ले शालेय जीवनामध्ये पाठ्यपुस्तकांमधून अभ्यासल्याने त्यांच्याबाबत प्रथमेश यांना नेहमीच आकर्षण राहीले. त्यातून, छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारसरणी आणि कार्यपद्धतीतून प्रेरीत होवून सह्याद्रीतील गडकोट व निसर्ग भटकंतीचे वेड लागल्याचे प्रथमेश सांगतात. पुणे येथे नोकरी करीत असतानाही त्यांनी गडकिल्ले सर करण्याचा छंद कायम जोपासताना त्यांनी दूर्गवीर प्रमोद मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री, बागलाण आणि सातमाळ डोंगररांगेतील सुमारे दोनशेहून अधिक गडकिल्ले आजपर्यंत सर केले आहेत. त्यामध्ये जमीनापासून सुमारे चारशे-साडेचारशे फूट उंचीचे आणि नव्वद अंश कोनामध्ये उभे असलेले अनेक सुळक्यांसह सर करणे अवघड असलेल्या गड किल्यांचा समावेश आहे. सुमारे नव्वद अंश कोनामध्ये उभा असलेला आणि जमिनीपासून सुमारे साडेचारशे फूट उंच असलेला खडा पारसी सुळका सर करण्याची मोहिम प्रथमेश याने प्रतिकूल स्थितीशी दोन हात करीत त्याने अवघ्या दिड तासामध्ये महिन्यामध्ये फत्ते केली आहे. यांसह किल्ले राजगड, दुर्ग तांदूळवाडी, लिंगाणा, मोरोशी भैरवगड, मलंगगड, तैलबैला, वजीर सुळका, शितकडा, वैराटगड, रांगणा, रोहिडेश्‍वर, सिद्धगड, गोरखगड, हरिहर, कोकणातील मनोहरगड, रांगण्या, मानगड, पाचाडकोट, कोकणदिवा, आदी थरारक दूर्गही प्रथमेश यांनी सर केले आहेत. केवळ स्वतः गड सर न करता स्वतःसोबत इतरांनाही या मोहिमेमध्ये सहभागी होवून दुर्गभेट द्यावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची अनुभूती घ्यावी म्हणून ते जनजागृती आणि प्रोत्साहन देत असतात. गडावर गेल्यावर त्या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवून त्याद्वारे सार्‍यांना गडाची स्वच्छता आणि पावित्र्य राखण्याचा संदेश देतात. त्यांनी केलेल्या या दुर्गभ्रमंतीसाठी अखिल चित्पावन ब्राम्हण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्यावतीने ९२ व्या वर्धापन दिनानिमित्ताने वि.दा. सावरकर शौर्य पुरस्काराने रत्नागिरी येथे नुकतेच गौरविण्यात आले. पाठ्यपुस्तकामधून अभ्यासलेले किल्यांची प्रत्यक्षात अनुभूती घेण्याच्या दुर्गवीर प्रथमेश यांच्या या साहसी अन् धाडसीवृत्तीची सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.