इसवली येथील ग्रामस्थ उमेश कदम उपोषणावर ठाम

२ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार उपोषण

लांजा( प्रतिनिधी) इसवली मठाचा पऱ्या ते सतीचा उंबर या रस्त्याच्या मजबुतीकरण डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असल्याने संबंधित ठेकेदार आणि यात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची यावे, या मागणीसाठी इसवली येथील ग्रामस्थ उमेश कदम हे उद्या २ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत.
इसवली मठाचा पर्ऱ्या ते सतीचा उंबर या रस्त्याचे काम जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात आले होते.मात्र अवघ्या दीड ते दोन महिन्यातच सदर रस्त्यावर खड्डे पडले असल्याने या रस्ताचे मजबुतीकरण डांबरीकरणाचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे कदम यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होती होती. त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम उपविभागा मार्फत ठेकेदार उषा प्रवीण कुमार राठोड यांना नोटीस बजावून सदरचे काम गुणवत्तापूर्ण करावे अन्यथा काळ्या यादी टाकले जाईल असा इशारा देण्यात आला होता .
जि. प. बांधकाम विभागाने जरी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली असली तरी देखील सदरच्या रस्त्याचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले असल्याने संबंधित ठेकेदारावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्याला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच जि प बांधकाम उपविभाग लांजा या विभागातील ज्या अधिकारी, कर्मचारी यांनी संबंधित ठेकेदाराला सदर मजबुतीकरण डांबरीकरणाचे काम योग्य पद्धतीने केले आहे असा दाखला दिला आहे त्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच जि प विभागातील जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावरील दोषी असल्याबाबतची त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद करण्यात यावी, अशा मागण्या उमेश कदम यांनी केलेल्या आहेत.
त्या प्रमुख मागण्यासाठी दिनांक २ ऑक्टोबर रोजी ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत.‌त्यांच्या या उपोषणाला इसवलीचे माजी सरपंच सचिन मेस्त्री यांनी पाठिंबा दिला असून ते देखील उपोषणाला बसणार आहेत.