साळशी येथे शेतकरी प्रशिक्षण वर्गास उत्स्फूर्त प्रतिसाद

भात पिकातील कीड व रोग व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

शिरगाव (प्रतिनिधी)देवगड तालुक्यातील साळशी येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत युएनडीपी–जीसीएफ–इसीआरआयसीसी पुरस्कृत प्रकल्प – सन २०२५ अंतर्गत भात लागवड करण्याची ‘श्री’ पद्धत तसेच भात पिकातील कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना देवगड तालुका प्रकल्प समन्वयक श्रीमती दीपिका रावराणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना प्रकल्पाचा मूळ उद्देश व संकल्पना सविस्तरपणे समजावून सांगितली. तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. भास्करराव काजरेकर (कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस) यांनी ‘श्री’ पद्धतीने भात लागवड करण्याच्या तांत्रिक बाबींबाबत तसेच भातातील कीड व रोग व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.यावेळी देवगड तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) निकेतन राणे यानी महाविस्तार AI ॲपबाबत माहिती दिली. त्यांनी ॲप प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल व रजिस्ट्रेशन प्रक्रिया दाखवून, त्याद्वारे शेतीविषयक मार्गदर्शन, समस्या निराकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती कशी मिळवता येईल हे प्रत्यक्ष दाखवले.यावेळी शिरगाव मंडळ कृषी अधिकारी डॉ. बापूसाहेब लांबाडे यांनी कृषी समुद्री योजनेतील अंतर्भूत बाबींवर सविस्तर माहिती दिली. साळशी गावच्या सरपंच सौ. वैशाली सुतार यांनी अध्यक्षीय भाषणातून कृषी विभागाच्या विविध योजनांचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमास सरपंच सौ. वैशाली सुतार, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भास्करराव काजरेकर, श्रीमती दीपिका रावराणे, शिरगाव मंडळ कृषी अधिकारी डॉ. बापूसाहेब लांबाडे, सहाय्यक कृषी अधिकारी गुरुनाथ बोर्डेकर, विजय सुतार, पोलिस पाटील सौ. कामिनी नाईक, श्री संत ग्रामसंघ साळशीचे सीआरपी सौ. ऋतुजा घाडी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकेतन राणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक कृषी अधिकारी गुरुनाथ बोर्डेकर यांनी केले.