सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा देवगड वकील संघटने कडून तीव्र निषेध

देवगड | भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड आणि घृणास्पद हल्याचा देवगड तालुका वकील संघटनेतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. देवगड दिवाणी न्यायालयाच्या पायऱ्यांवर आज वकील संघटनेतर्फे आंदोलन करून या घटनेविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.

 

या आंदोलनात देवगड वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. देवानंद गोरे, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अविनाश माणगावकर, ॲड. प्रकाश बोडस, ॲड. लक्ष्मीकांत नाथगोसावी, ॲड. अभिषेक गोगटे, ॲड. इंद्रनील ठाकूर, ॲड. प्रसाद करंदीकर, ॲड. अनुराग बापट, ॲड. मैथिली खोबरेकर, ॲड. आरती दामले, ॲड. अन्वी कुलकर्णी, ॲड. अपर्णा परांजपे, ॲड. संगीता कालेकर, ॲड. हेमांगी वारीक यांसह अनेक वकील उपस्थित होते.

 

वकील संघटनेतर्फे सांगण्यात आले की, मा. भूषण गवई हे भारतीय न्यायव्यवस्थेच्या सन्माननीय परंपरेचे प्रतीक असून, त्यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ एका न्यायाधीशावर नव्हे, तर देशाच्या न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर झालेला आघात आहे.

 

हा हल्ला अत्यंत निंदनीय असून, दोषींवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली. तसेच, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश तसेच इतर न्यायमूर्तींच्या सुरक्षेची प्रभावी व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती शासन आणि पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली.

 

न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, आणि तिच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला सहन केला जाणार नाही, असा इशारा देवगड तालुका वकील संघटनेतर्फे देण्यात आला.