मध्यस्थता समितीवरही तज्ज्ञ मध्यस्थ म्हणून नियुक्ती
कणकवली : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी मोफत विधी सेवा समितीच्या पॅनेलवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ॲड. उमेश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समितीमार्फत ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
नुकत्याच स्थापन झालेल्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी विधी सेवा समितीमार्फत गरजूंना मोफत विधी मदत उपलब्ध करून देण्यासाठी विधिज्ञांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ॲड. उमेश सावंत यांची दिवाणी, फौजदारी आणि महसुली प्रकरणांसाठी पॅनेलवर निवड करण्यात आली आहे.
या माध्यमातून कोल्हापूर सर्किट बेंचसमोरील खटल्यांमध्ये विधी सेवा समितीमार्फत गरजूंना न्यायसहाय्य मिळवून देण्यासाठी ॲड. सावंत कार्यरत राहतील. तसेच, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी तज्ज्ञ मध्यस्थ (Expert Mediator) म्हणूनही त्यांची निवृत्त न्यायाधीशांसोबत नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मानाचा मुद्दा ठरत असून, ॲड. सावंत यांच्या या निवडीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.












