देवगड | देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळ, देवगड यांनी देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत गंभीर हरकत नोंदवली आहे. मंडळाने नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आराखडा तयार करताना स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता तो नगररचना विभागामार्फत तयार करण्यात आला आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे.
मंडळाचे प्रतिनिधी नगरपंचायतीच्या कार्यालयात भेट देऊन आराखड्यातील त्रुटींबाबत अधिकाऱ्यांना अवगत केले. परंतु आराखड्यात केवळ सर्वे नंबर नमूद असल्यामुळे नागरिकांना त्यांच्या जमिनीचा त्यात समावेश आहे की नाही हे समजत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर, दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी नागरिक मंडळासोबत उपस्थित राहिले. या बैठकीत मंडळाने काही बाबी आराखड्यात समाविष्ट करण्याची मागणी केली असून, त्यावर गांभीर्याने विचार करून बदल करण्यात यावेत अशी मागणीही केली आहे.
या हरकतीची प्रत नगररचना विभागाच्या सिंधुदुर्ग शाखेला देखील पाठवण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष निशिकांत साटम, विलास रूमडे , सुधीर मांजरेकर, यांच्यासह देवगड जामसंडे मधील अनेक नागरिक उपस्थित होते. देवगड जमसडे नगरपंचायतीच्या वतीने विवेक खोत यांनी संवाद साधला.













