BANDA | खेमराज मेमोरियल स्कूलच्या कँटीनमध्ये अचानक स्फोट — सुदैवाने जीवितहानी टळली!

बांदा/प्रतिनिधी
खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या कँटीनमध्ये सायंकाळी झालेल्या अचानक स्फोटाने परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी, स्फोटानंतर कँटीनमध्ये आगीचा मोठा भडका उडाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सुदैवाने स्फोटाच्या वेळी कँटीन बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आग लागल्यानंतर काही वेळातच परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच बांदा पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, आगीचे कारण आणि स्फोटामागील कारणांचा तपास सुरू आहे.

या घटनेमुळे शाळा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिक आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.