आंबोली । प्रतिनिधी : आंबोली येथील गावठणवाडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले आनंद सुरेश कदम (वय ३६, रा. गेळे ) यांनी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण होऊ शकत नाही, या नैराश्यातून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास गेळे, कदम वाडी येथे घडली. कदम यांच्या आत्महत्येमुळे शिक्षण क्षेत्रात आणि आंबोली-गेळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
अशी घडली घटना:
मुख्याध्यापक आनंद कदम हे गेळे येथील त्यांच्या राहत्या घरी होते. गुरुवारी रात्री कामावरून घरी परतलेल्या त्यांच्या भावाला खिडकीतून आत गळफास घेतलेल्या अवस्थेत आनंद कदम दिसले. घराचा दरवाजा आतून बंद होता. भावाने तत्काळ या घटनेची माहिती आंबोली पोलीस स्थानकात दिली. माहिती मिळताच, आंबोली पोलीस स्थानकाचे सहाय्यक उपनिरीक्षक संतोष गलोले आणि हवालदार लक्ष्मण काळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणला.
आनंद कदम यांचे आई-वडील पुणे येथे होते, तर त्यांची पत्नी आणि सहा वर्षांचा मुलगा गडहिंग्लज येथे राहत होते. घटनेची माहिती मिळताच त्यांना बोलावण्यात आले. या घटनेमुळे कदम यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. जी.बी. सारंग आणि डॉ. महेश जाधव यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले.
आनंद कदम हे स्वभावाने अत्यंत मनमिळाऊ, कर्तव्यनिष्ठ आणि शिक्षणप्रेमी म्हणून परिसरात परिचित होते. शिक्षकी पेशात त्यांनी प्रामाणिकपणे काम केले होते. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव आणि शिक्षण सेवावृत्ती चांगली असल्याने त्यांची अशी अकाली एक्झिट अनेकांना चटका लावून गेली आहे. या घटनेनंतर आंबोली, गेळे आणि पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात आली.
यावेळी शिक्षण वर्ग, राजकीय पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दुर्दैवी प्रसंगी दिनेश गावडे, संतोष पालेकर, सरपंच सागर ढोकरे, दिलीप सावंत, तातोबा गवस, बबन गावडे, गावठणवाडी येथील नागरिक यांच्यासह आंबोलीमधील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते आणि गेळे ग्रामस्थ उपस्थित होते.
*सुसाइड नोटमध्ये टीईटीचा उल्लेख*
घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी (सुसाइड नोट) आढळून आली. या चिठ्ठीत आनंद कदम यांनी ‘मी टीईटी परीक्षा पास होऊ शकत नाही’ असा स्पष्ट उल्लेख करून आत्महत्येचे कारण नमूद केले आहे. त्यामुळे त्यांनी याच कारणास्तव आपले जीवन संपवले असेल असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.












