दापोली ( प्रतिनिधी) : दापोली कोकण कृषी विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या वनमाला बालाजी जायभाय या शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात केळकर नाका परिसरात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, वनमाला जायभाय आपल्या लहान मुलींना शाळेत सोडण्यासाठी नेहमीप्रमाणे दुचाकीवरून निघाल्या होत्या. त्या केळकर नाका परिसरात येऊन नर्सरी रोडकडे वळत असताना त्यांच्या दुचाकीची दुसऱ्या एका दुचाकीशी समोरासमोर धडक झाली. या धडकेत वनमाला जायभाय गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना तत्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने त्यांच्या दोन्ही मुलींना केवळ किरकोळ दुखापत झाली असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अपघातानंतर काही काळ परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती.
घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत करण्यासोबतच पुढील तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसून, पोलिसांकडून दोन्ही दुचाकीस्वारांची चौकशी सुरू आहे.













