आमदारांची कसोटी, राजकारणात नसलेल्या नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता
संतोष कोत्रे
लांजा -: लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठीचे आरक्षण पडल्यानंतर आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यावेळी नगराध्यक्ष पदासाठीची निवडणुकी विशेष लक्षवेधी ठरणार आहे. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी अन्य पक्षांच्या तुलनेत शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे.अनेक जणांनी तर नगराध्यक्ष पदावर डोळा ठेवूनच पक्षात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाची निवड करताना आमदार किरण सामंत यांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे इच्छुकांपैकी साऱ्यांना बाजूला करून नगराध्यक्ष पदासाठी राजकारणात नसलेल्या परंतु जिंकून येईल अशा नवीन चेहऱ्याला आमदार संधी देतील, अशी दाट शक्यता व्यक्त होत आहे.
गेल्या सात महिन्यांपासून प्रशासकीय कारभार असलेल्या लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठीचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. यावेळी नगराध्यक्ष तसेच नगरपंचायतीच्या १७ पैकी ९ जागा या महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे यावेळी नगरपंचायतीवर महिलाराज येणार आहे. सध्या सर्वच राजकीय पक्षांनी नगराध्यक्षसहित नगरसेवक पदासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे .सद्यस्थितीत शिवसेना ठाकरे गट, भाजपा, काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांपेक्षा शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या ही सर्वाधिक आहे. यातील अनेक जणांनी आपल्या पत्नीलाच उमेदवारी मिळणार असे यापूर्वीच ठासून सांगितलेले आहे.तर काही जणांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्या अगोदरच आपल्यालाच नगराध्यक्ष पदाचे तिकीट मिळेल, या हेतूनेच पक्षात जाहीर प्रवेश केलेला होता .त्यामुळे या निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेना शिंदे गटांमध्येच नगराध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी आपल्यालाच तिकीट देणार असल्याचे आपल्याला सांगितले होते, असे अनेक जण छातीठोकपणे सांगताना दिसत आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची भली मोठी संख्या असल्याने नगराध्यक्ष पद कोणाच्या पदरात पडणार याकडे लांजावासियांचे लक्ष लागले आहे .या सर्व इच्छुकांमधून आमदार किरण सामंत हे या पदासाठी कोणाची निवड करतात किंवा कोणावर या पदासाठी विश्वास टाकतात? हे आगामी काळात दिसून येणार असले तरी नगराध्यक्ष पदासाठी निवड करणे हे आमदार किरण सामंत यांच्यासमोर एक कठीण आव्हान असणार आहे .त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी आमदार किरण सामंत हे इच्छुकातीलच एकाची निवड करणार? की भाकरी परतवणार ? याकडे लांजावासियांचे लक्ष लागले आहे.
आमदार किरण सामंत हे प्रचंड हुशार आणि संघटनेवर पकड असणारे नेतृत्व आहे. मागील नगराध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर शहरातील नागरिकांमध्ये असलेला प्रचंड रोष लक्षात घेता आमदार किरण सामंत हे प्रस्थापित उमेदवारांपेक्षा एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वी राजकारणात नसलेल्या परंतु उच्चशिक्षित, जनमानसात चांगली प्रतिमा असणाऱ्या अशा एखाद्या नवीन उमेदवाराच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आमदार सामंत हे अशा प्रकारे वेगळा पर्याय निवडण्याची शक्यता शक्यता आहे .त्यामुळे आमदार हा अशा प्रकारचा मास्टर स्ट्रोक मारून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विरोधकांना चारी मुंड्या चीच करण्याची शक्यता आहे .
विरोधी पक्षाकडून देखील नगराध्यक्ष पदासाठी आपापल्या उमेदवारांची चाचणी केली जात आहे. सद्यस्थितीत लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रात आणि एकूणच तालुक्यात शिंदे गटाचा प्रभाव आहे. त्याचा फायदा निश्चितच नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.













