कडकडणाऱ्या विजांसह वादळी वाऱ्याचा गावाला मोठा फटका
रत्नागिरी | प्रतिनिधी :
बुधवारी (१५ ऑक्टोबर) रत्नागिरी शहर आणि तालुक्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः रत्नागिरी तालुक्यातील करबुडे आणि शितलवाडी बौद्धवाडी या दोन वाड्यांना या वादळाचा मोठा फटका बसला आहे. यात करबुडे धनावडे वाडी येथे रमेश देमा धनावडे यांचे दोन बैल वीज पडून मरण पावले आहेत. तर अनेक घरांचे गोठ्यांची तसेच वाचनालय आणि शाळांची पडझड होऊन लाखोंचे नुकसान झाले आहे.
हवामान खात्याने वर्तवलेला पावसाचा अंदाज खरा ठरवत, मोसमी पावसाने परतीची वाट धरली असताना हा अवकाळी पाऊस झाला. रत्नागिरी शहर आणि परिसरात बुधवारी ढगांच्या गडगडटात, विजांच्या कडकडाटात पावसाची सुरुवात झाली. पावसासोबत वेगवान वारेही वाहिले. यामुळे अनके ठिकाणी पडझड झाली. या वादळी पावसाचा मोठा फटका रत्नागिरी तालुक्यातील करबुडे गावाला बसला. येथील अनेक घरे गोठे यांची पडझड झाली. करबुडे धनावडे वाडी येथे रमेश देमा धनावडे यांचे दोन बैल वीज पडून मरण पावले आहेत. त्याशिवाय गावातील करबुडे आणि शितपवाडी आणि बौद्धवाडी येथे विजा आणि वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये येथील एकूण १४ ते १५ घरे आणि मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे.
वादळी पावसामुळे प्रभावित झालेल्या काही प्रमुख व्यक्तींमध्ये प्रभाकर केरू जाधव, मिलिंद भागुराम जाधव, शैला अशोक जाधव, प्रकाश सिताराम जाधव, प्राची बबन जाधव (घराचे पत्रे आणि कौले उडाली), दीपक गोविंद पाष्टे (घराचे पत्रे), सुरेश रामचंद्र पास्ट (घराचे पत्रे), गणपत पांडुरंग पाष्टे यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. शंकर केरू जाधव यांच्या गोठ्याची कौले उडाली. राकेश जाधव यांच्या गोठ्याचे नुकसान झाले. लखमा गोपाळ पाचपुडे यांच्या मटन शॉपला फटका बसला.
त्याशिवाय गावातील बुद्ध विहाराला वादळी वाऱ्याचा फटका बसला. एक नंबर शाळा – कंपाउंड वॉल (भिंत) आणि शौचालयाच्या इमारतीचे नुकसान झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे नुकसान झाले. करगुडे हायस्कूलचे नुकसान झाले. रायगडेवाडी शाळा – कौले आणि खिडक्यांचे मोठे नुकसान झाले.
या नैसर्गिक आपत्तीमुळे रत्नागिरी तालुक्यात, विशेषतः या वाड्यांमध्ये, मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.










