वैभववाडीत मुसळधार पाऊस : भात कापणीला पावसाचा फटका

वैभववाडी प्रतिनिधी :
बुधवारी सायंकाळी वैभववाडी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सुमारे दोन तास लागलेल्या जोरदार पावसाने वैभववाडी शहरात पाणीच पाणी झाले होते. अचानक आलेल्या पावसाने आठवडा बाजारासाठी आलेल्या फिरत्या व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तर कापलेल्या भात शेतीचे नुकसान झाले आहे.

आठ दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे सध्या तालुक्यात भात कापणीला जोरदार सुरुवात झाली आहे. गेले दोन दिवस उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. त्यातच बुधवारी सायंकाळी अचानक तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला. अचानक आलेल्या पावसाने कापून ठेवलेले भात पिकाचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी या मुसळधार पावसाने भात शेती आडवी झाली आहे. त्यामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
बुधवारी वैभववाडी शहराचा आठवडा बाजार असतो. आठवडा बाजारासाठी आलेले व्यापारी व ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरात रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. पावसाने जोर पुढे असाच ठेवल्यास भातशेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.