सौ. भक्ती प्रसाद गांवस – तावडे यांना ‘पीएचडी’ प्रदान

बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांच्या ग्रंथालय योगदानावर शोध प्रबंध 

सावंतवाडी । प्रतिनिधी : श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिबडेवाला (जे. जे. टी.) विद्यापीठ, झुंझुनू, राजस्थान यांनी सौ. भक्ती प्रसाद गांवस – तावडे यांना ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी’ (पीएचडी) पदवी प्रदान केली आहे. सौ. गांवस यांनी ‘लायब्ररी ऑफ सायन्स’ (ग्रंथालय शास्त्र) या विषयात हा मानाचा टप्पा गाठला आहे.

या यशासाठी त्यांनी “बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड ( तृतीय ) का पुस्तकालय मे विशेष योगदान ” हा महत्त्वपूर्ण हिंदी शोध प्रबंध सादर केला होता. या प्रबंधाद्वारे, बडोद्याचे थोर शासक सयाजीराव गायकवाड (तृतीय) यांनी आपल्या संस्थानात शिक्षण आणि ज्ञान प्रसारणासाठी ग्रंथालयांचे मजबूत जाळे कसे उभे केले आणि यातून त्यांनी कसा प्रजाभिमुख राजकारभार केला, याचे चिकित्सकपणे विश्लेषण केले आहे. महाराजांच्या या दूरदृष्टीच्या कार्याचे त्या काळात जगभरात कौतुक झाले होते. सौ. गांवस यांनी महाराजांच्या या सर्व कार्याचा सखोल आढावा आपल्या प्रबंधात घेतला आहे.

जे. जे. टी. विद्यापीठाने या प्रबंधाला मान्यता देऊन सौ. भक्ती गांवस यांना पीएचडी पदवी प्रदान केली आहे. त्यांना या संशोधनासाठी प्रो. अमजत अली आणि डॉ. जी. ए. बुवा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच, या प्रबंधाच्या कामात ज्येष्ठ साहित्यिक श्री. बाबा भांड, डॉ. रमेश वरखेडे, आणि गोवा सेंट्रल लायब्ररीचे माजी क्यूरेटर डॉ. सुशांत तांडेल यांचेही विशेष मार्गदर्शन मिळाल्याचे सौ. भक्ती गांवस यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले.

शैक्षणिक आणि ग्रंथालय क्षेत्रात सौ. भक्ती गांवस यांचे मोठे योगदान आहे. यापूर्वी त्यांनी प्रगती महिला अध्यापक महाविद्यालय, तोरसे, गोवा येथे तसेच वासूदेवानंद सरस्वती महाविद्यालय, माणगाव येथे ग्रंथपाल म्हणून काम पाहिले आहे. सध्या त्या श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक (YCMOU) अंतर्गत घेण्यात येणाऱ्या ग्रंथालय आणि माहिती शास्त्र पदवी आणि पदवीत्तर शिक्षण अभ्यासक्रमासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक आणि संशोधनात्मक यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.