तालुक्याच्या सर्वांगीण विकासात शिक्षकांचे मोठे योगदान – जयेंद्र रावराणे 

वैभववाडीत सेवानिवृत्त कर्मचारी सन्मान सोहळा संपन्न 

वैभववाडी l प्रतिनिधी :                 तालुक्याच्या सर्वांगीण विकासात ज्येष्ठ शिक्षकांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. प्राथमिक शिक्षकांचे शैक्षणिक विकासात फार मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी केले.

     महाराष्ट्र राज्य सेवानीवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटना शाखा वैभववाडी यांच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचारी सन्मान सोहळा संपन्न झाला.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सखाराम देसाई उपस्थित होते. यावेळी माजी वित्त बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती बाप्पी मांजरेकर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद नारकर, सचिव नितीन जठार, राज्य उपाध्यक्ष गुंडू चव्हाण, संतोष कदम, प्रकाश साळुंखे व सेवानिवृत्त शिक्षक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सखाराम देसाई म्हणाले, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी एकजुटीने राहिले पाहिजे. तुम्ही संघटित राहिलात तर तुमच्या समस्या जलदगतीने सुटू शकतात.

बाप्पी मांजरेकर म्हणाले, शिक्षकांनी आम्हाला घडविले आहे. त्यांनी आमच्यामध्ये चांगले संस्कार रुजविले. ती संस्काराची शिदोरी पाठीशी बाळगून आम्ही मार्गक्रमण करत आहोत असे सांगितले. शरद नारकर, नितीन जठार, संतोष कदम, श्री चव्हाण, प्रकाश साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले.

 निवृत्त शिक्षकांचा पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी रामचंद्र आडुळकर, श्रीधर रावराणे, मधुसूदन कदम, सुप्रिया परब, पुनम कदम, अरुण पंडित, रघुनाथ बोभाटे, नाना तांबे, मनोहर साटम व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाला विशेष सहकार्य उद्योजक सुनील सदानंद नारकर यांचे लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कोलते, तर आभार सुहास रावराणे यांनी मानले.