पंचक्रोशी जी पालकवर्गातून कौतुक-
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — सहामाहीच्या परीक्षा संपल्या आणि सुट्टी पडण्यापूर्वीचे तीन चार दिवस– मौज मस्ती मज्जेचे ! तरीही फोंडाघाट लोरे सारख्या विकसनशील गावातील अति ग्रामीण वाड्यावाड्यावरील जि.प. शाळा, लोरे – नरावाडीतील शाळकरी स्नेह्यांनी, आपल्या शाळेच्या आवारात, शिवरायांच्या गड- किल्ले दगड, माती,पाणी, फुले, पाने यांच्या माध्यमातून बनविले. इतिहासात बाईंनी शिकविलेल्या गडकिल्ल्यांच्या वर्णनाचे प्रतिबिंब आपल्या मातीकामातून मुलांनी साकार करण्याचा प्रयत्न, कौतुकास्पद होता. तर चित्रकलेच्या माध्यमातून रंगरंगोटीने तो किल्ला, भगवा ध्वज, मावळे, तोफा, खंदक,आणि महादरवाजा हुबहू तयार केले होते. औचित्य होते दीपावलीचे आणि मुलांनी शिवरायांच्या ऐतिहासिक कथांचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा इतिहास गड किल्ल्यातून अनुभवला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अदभुत निर्मितीचा आनंद ओसंडत होता. त्यांना शिक्षिका माधवी जोशी, संगीता माणगावकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या कलाकारीचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे….











