मिरजोळे पाडावेवाडी येथील श्रीकांत पाडावे यांचे निधन

रत्नागिरी | प्रतिनिधी : 

रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे पाडावेवाडी येथील सुस्वभावी व हसतमुख व्यक्तिमत्व असलेले श्रीकांत बाळकृष्ण पाडावे (वय 41) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने सर्वपरिचित असलेल्या त्यांच्या मित्रपरिवारासह परिसरावर शोककळा पसरली आहे.
श्रीकांत पाडावे हे एक मनमिळाऊ, हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. कोणत्याही सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहून गरजूंना मदतीचा हात देण्याच्या वृत्तीमुळे त्यांचा परिसरात मोठा सलोखा होता. पाडावेवाडी येथील ‘एकता परिवारा‘चा ते एक खंदे सदस्य होते. रत्नागिरी एमआयडीसीमध्ये टी.जे. मरीन कंपनीत ते कामाला होते.
गुरुवारी 16 ऑक्टोबर रोजी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले. मात्र, शुक्रवारी सायंकाळी त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, तर मित्रपरिवाराला जबर धक्का बसला.
शनिवारी 18 ऑक्टोबर रोजी दुपारी शोकाकुल वातावरणात मिरजोळे येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठय़ा संख्येने नातेवाईक, ग्रामस्थ आणि मित्रमंडळी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पाडावेवाडी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.