वंदे भारतमध्ये जेवणात आढळलं माणसाचं नख

 

खेड(प्रतिनिधी) भारतातील सर्वाधिक वेगवान आणि आमरामदाई असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणात मानवी नख आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये घडला. दरम्यान, प्रवाशाने या प्रकाराची तक्रार केल्यावर भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टरला तब्बल २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या घटनेचा व्हिडिओ एका प्रवाशाने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला असून तो चांगलाच व्हायरल होत आहे.

देशभारत वेगवान आणि आरामदाई प्रवासासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. मात्र, या गाडीत मिळणाऱ्या सुविधेबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या गाडीतून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या जेवणात चक्क मानवी नख सापडले. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये पाकीटबंद जेवण दिले जाते. यात हे नख सापडले. दरम्यान, संबधित प्रवाशाने याचा व्हिडिओ बनवत तो सोशल मिडियावर ट्विट केला आहे. त्याने मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मिळणारया खराब सेवा आणि जेवणाच्या दर्जाबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दरम्यान, आयआरसीटीसीने याची गंभीर दखल घेत जेवण देणाऱ्या कंत्राटदाराला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टरवर दंडाव्यतिरिक्त, अशा घटना टाळण्यासाठी काही प्रोटोकॉल पाळण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणावर देखरेख ठेवण्यासाठी एक उच्च दर्जाचा अधिकारी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवास करणार आहे. IRCTC ने रत्नागिरी येथील बेस किचनमध्ये देखरेख देखील कडक केली आहे. येथूनच रात्रीचे जेवण ट्रेनमध्ये लोड केले जाते.