स्थानिकांनी संशयिताला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले
तरीही चोरीचा उलगडा नाही
कणकवली : तालुक्यातील जानवली येथील रिगल कॉलेजमध्ये चोरट्यांनी धाडसी चोरी करून लॉकर फोडत तब्बल ५ लाख ४ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरी प्रकरणी स्थानिकांनी एका संशयित व्यक्तीस पकडून कणकवली पोलिसांच्या स्वाधीन केले; मात्र अद्याप चोरीचा उलगडा झालेला नाही.
शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कॉलेज नियमितपणे बंद करण्यात आले होते. रविवारी सुट्टी असल्याने कॉलेज बंद होते. मात्र, दुपारी दोनच्या सुमारास कॉलेज आवारात एक महिला व एक पुरुष फिरत असल्याचे स्थानिकांना दिसले. त्यानंतर स्थानिकांनी तातडीने कॉलेज व्यवस्थापनाला माहिती दिली आणि त्या पुरुषाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कॉलेजच्या क्लार्क वृषाली परब या सायंकाळी चारच्या सुमारास कॉलेजमध्ये आल्या. त्यांनी तपास केला असता लॉकर असलेले लोखंडी कपाट हत्याराने उघडलेले असल्याचे निदर्शनास आले. या लॉकरमध्ये एकूण ६ लाख ४२ हजार रुपये रोकड ठेवण्यात आली होती. त्यापैकी १ लाख १० हजार रुपये जागेवरच आढळले, तर ५ लाख ४ हजार रुपये लंपास झाल्याचे दिसून आले.
या प्रकरणी वृषाली परब यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस तपास सुरू असून, कॉलेजमधील सीसीटीव्ही फुटेज आणि पकडलेल्या संशयिताची चौकशी सुरू आहे.







