अपहरण तसेच घरफोडीचे परस्परविरोधी गुन्हे दाखल
नऊ जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
सावंतवाडी: शहरातील सर्वोदय नगर परिसरात सुमारे साडे चार कोटी रुपयांच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून दोन गटात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोठा राडा झाला. यात अपहरण करणे, गाडी अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण आणि घरफोडी अशा गंभीर स्वरूपाचे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पुणे येथील पाच आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार अशा एकूण नऊ जणांना सावंतवाडी पोलिसांनी अटक केली असून, त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
काय आहे प्रकरण?
घटनेची सुरुवात शेअर मार्केटमधील पैशांच्या परताव्यावरून झाली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पुणे येथील गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा देण्यास विलंब झाल्याने, त्याबदल्यात आलिशान कार घेऊन जाण्यासाठी ते सावंतवाडीत आले होते. मात्र, संबंधित व्यक्तीने वेळेत फोन उचलला नाही, यातूनच हा सर्व प्रकार घडला.
पुणे गटावर झालेले गुन्हे:
सागर कारिवडेकर यांच्या सुपरवायझरचे, वामन ऊर्फ नितीन मेस्त्री यांचे अपहरण करून त्यांना आरोज न्हावेली येथे नेऊन मारहाण करण्यात आली. तसेच, कारिवडेकर यांच्या बंद सदनिकेत अनधिकृत प्रवेश करत दरवाज्याची कडी-कोयंडा उघडणे आणि सर्वोदय नगर येथील आलिशान घराच्या काचा दगडाने फोडल्याप्रकरणी पुणे येथील शंभूराजे देवकाते, शौनक सकपाळ, बॉबी काकडे, अतुल धीवरे, श्रीकांत कांबळे (सर्व रा. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावंतवाडी गटावर झालेले गुन्हे:
दुसरीकडे, पुणे येथील संशयित आरोपींनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी रात्री तल्हा राजगुरू याने शौनक सपकाळ आणि अशोक ऊर्फ बाबू काकडे यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर गाडी घालून दुखापत केली. तसेच, इतरांनी मिळून शौनक सकपाळ, बॉबी काकडे, अतुल धीवरे, श्रीकांत कांबळे यांना मारहाण केली. याप्रकरणी वामन ऊर्फ नितीन मेस्त्री, तल्हा राजगुरू, अब्दुल खान, तेयशील दरवाजकर (सर्व रा. सावंतवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या कारही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
घटनास्थळी ‘रिक्रिएशन’
सर्व प्रकार सावंतवाडी शहरातील सर्वोदय नगर येथील कारिवडेकर यांच्या बंगल्यात आणि बंगल्यासमोर घडला. घटनेच्या गंभीरतेमुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास आणि वस्तुस्थितीची पडताळणी करण्यासाठी फोरेन्सिक टीमद्वारे घटनास्थळाचे ‘रिक्रिएशन’ (गुन्ह्याची पुनर्रचना) करण्यात आले आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी नऊ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी उशिरा सर्व आरोपींना येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे करत आहेत.












