कोकणच्या मातीतला नाटककार गेला.. सौ. रश्मी कशेळकर 

नाना गेल्याचं कळलं. गंगाराम गवाणकर म्हणजे आमचे नाना.

मोठा गप्पाळू माणूस. ते गेल्याचं कळल्यावर मनात आलं ते पहिलं हे आणि दुसरं म्हणजे

पक्का मासेखाऊ आणि मासे खिलवणारा माणूस.

नाटक जगातले नाना , साहित्य जगातही सगळ्यांच्या ओळखिचे होते अगदी नाटक साहित्याचा भाग असलं तरी. एरव्ही असं उदाहरण दुर्मीळ. आमच्या आणि माझ्या आधीच्या पिढीने त्यांचा म्हणजे ‘वस्त्रहरण’ नाटकाचा सुवर्णकाळ अनुभवला.

माझं बालपण देवगडमध्ये गेलं. आमच्या त्या खाडीकाठच्या वाडीत वस्त्रहरणची कॅसेट वाजत राहायला काही निमित्त लागत नसे. रंगमंचावर न पाहता लहान- थोरांपर्यंत पोचलेलं हे नाटक ही या नाटकाची खासियत. शिवाय हे एकमेव नाटक असेल की जे केवळ मालवणी माणसाचंच नव्हे तर मराठी माणसांचं तोंडपाठ होतं. वस्त्रहरण बद्दल अनेक दिग्गज लिहून गेले आहेत त्यात परिपूर्ण लेख लिहिलाय तो समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांनी.

मा. गंगाराम गवाणकर यांना भेटायला गेले तेव्हा मी कोकणात राहून प्रथम माडबन हे त्यांचं गाव बघितलं. खूप सुंदर समुद्रकिनारा लाभलेलं हे लहानसं खेडं. ते आजही खेडंच आहे. नाना तिथं येऊन राहिले. घराची डागडुजी केली, मारूतीचं देऊळ बांधलं आणि जुनी झाडं जपली. माडबन किनार्‍यावरून पलिकडचा घेरिया म्हणजे विजयदुर्ग किल्ला दिसतो म्हणून हा अतिशय मोहक किनारा. मी या किनार्‍यावर बसून नानांना ऐकलं हे माझं भाग्य.

नाना गवाणकरांच्या दारात माडबनला भली मोठी सुरंगी आहे, असेल शंभरेक वर्षांची. त्यांचं खूप प्रेम तिच्यावर. तिच्या सुगंधाबद्दल बोलत ते राहायचे. मधाच्या पोळ्यांबद्दल आणि अनेक किटकांबद्दल.. इथं त्यांच्यातला कोकणी माणूस दिसायचा. महानगरात आयुष्य गेलं तरी काही वर्षे ते इथं राहायला आले , गावच्या ओढीने आणि जिथं वस्त्रहरण घडलं त्या परिसरात.

माडबन म्हणजे कांदळवनांनी भरलेली खाडी आणि भरपूर माशांचा प्रदेश. टाळी वाजवल्यासारखा दोन्ही हातात मासा पकडण्याची पद्धत मी इथं पाहिली ती नानांनी दाखवली म्हणून.

नाना चांगले वाचक होते. माझं पुस्तक वाचून त्यांनी आवडल्याचा फोन केला आणि मी माडबनला त्यांना भेटायला गेले तेव्हा जाणवले की त्यांनी कोकणातले अनेक लिहिते लेखक वाचलेले आहेत. शिवाय त्यांनी अनेक नाटके रंगमंचावर आणली आहेत..ती आणणारी माणसेही आत्ता त्यांच्या आसपास तयार होत आहेत. या वातावरणात ते रंगून गेले आहेत.

औषधोपचारासाठी त्यांना मुंबईत जावे लागले. पण बोलणे होई तेव्हा तोच खणखणीत आवाज त्यामुळे त्यांचे जाणे धक्कादायक.

या कोकणातल्या मातीतला हा लेखक आपलं नाटक लंडनला घेऊन गेला की ते ‘ वस्त्रहरण’ इथल्या माणसाला,या भाषेला आपल्या देशावर राज्य केलेल्या देशात घेऊन गेले ?

या खाडीकाठाने प्रवास करताना जेव्हा जेव्हा ‘घेरिया’ दिसेल तेव्हा तेव्हा नाना गवाणकरांची आठवण येत राहील.

रश्मी कशेळकर.