बचावकार्यासह तीन हरवलेल्या मुलांचे पालकांशी सुखरूप पुनर्मीलन.
पणजी, ऑक्टोबर २०२५: अवकाळी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरही गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर स्थानिक आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे. या वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, बागा-कळंगूट समुद्रकिनाऱ्यांवर गेल्या वीकेंडला झालेल्या दोन स्वतंत्र दुर्घटनांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांना बुडण्यापासून वाचवण्यात आले, अशी माहिती दृष्टी मरीनच्या लाइफसेव्हर दलाकडून देण्यात आली आहे.
बागा बीच – नाशिक येथील चार किशोरवयीन मुलांचा बागा समुद्रकिनाऱ्यावर लाटांच्या जोरदार प्रवाहात अडकून बुडण्याचा प्रसंग घडला. या चौघांपैकी तीन अल्पवयीन होते. ही मुले सुमारे २० विद्यार्थ्यांच्या गटासोबत समुद्रकिनाऱ्यावर आली होती. ड्युटीवरील लाईफसेव्हर्सनी खोल पाण्यात न जाण्याचा दिलेला इशारा त्यांनी दुर्लक्ष केला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लाईफसेव्हर सूर्यकांत पऱ्येकर यांनी तात्काळ रेस्क्यू बोर्डच्या सहाय्याने बचावकार्य सुरू केले. त्यांच्या मदतीला पर्यवेक्षक विनोद गावंकर (रेस्क्यू ट्यूब), नंदकिशोर (रेस्क्यू बोर्ड) आणि जितेंद्र गिरी (रेस्क्यू ट्यूब) धावून आले. सर्व चारही मुलांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात लाईफसेव्हर्सना यश आले.
कळंगूट बीच (बचाव) – महाराष्ट्रातील सांगली येथील दोन तरुणांना कळंगूट समुद्रकिनाऱ्यावर जोरदार प्रवाहात अडकून बुडण्यापासून वाचवण्यात आले. सतर्कता आणि तत्परतेने प्रतिसाद देत लाईफसेव्हर्स शिवम राजभर आणि अंकुर कुमार यांनी रेस्क्यू ट्यूबच्या सहाय्याने दोघांनाही सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले.
कळंगूट बीच (हरवलेली मुले शोधली) –कळंगूट समुद्रकिनाऱ्यावर तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये हरवलेल्या मुलांना दृष्टी मरीनच्या सतर्क लाईफसेव्हर्सनी शोधून त्यांच्या पालकांशी सुरक्षितपणे पुनर्मीलन करून दिले. पहिल्या घटनेत पाच वर्षांचा मुलगा वडिलांपासून वेगळा झाल्याची नोंद मिळताच लाईफसेव्हर्सनी तत्काळ शोधमोहीम राबवून त्याला सुखरूप वडिलांकडे परत आणले. दुसऱ्या घटनेत नागपूरहून आलेला आणखी एक पाच वर्षांचा मुलगा गर्दीत हरवला होता, परंतु ड्युटीवरील लाईफसेव्हर्सनी तातडीने प्रतिसाद देत त्यालाही सुरक्षितपणे पालकांशी पुन्हा एकत्र करून दिले.
दृष्टी मरीनचे लाईफसेव्हर सुनील माटोंडकर यांच्या तत्परतेमुळे अलिगड (उत्तर प्रदेश) येथील १२ वर्षीय मुलाला शोधण्यात यश आले. गस्त घालत असताना सुनील यांनी त्या मुलाला एकट्याने पाण्यात शिरताना पाहिले. चौकशी केल्यावर त्या मुलाने सांगितले की तो मुंबईहून एकटाच गोव्यात आला आहे. सुनील आणि बीच मार्शल रघुनाथ यांनी त्या मुलाला किनाऱ्यावरील लाईफसेव्हर टॉवरमध्ये सुरक्षित नेऊन नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.











