बांद्यातील युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न : उपचारादरम्यान मृत्यू

सावंतवाडी :
बांदा मुस्लिमवाडी येथील रहिवासी आफ्ताफ कमरुद्दिन शेख (३८) याने बुधवारी पहाटे राहत्या घरी गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर उपचारादरम्यान सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून गोवा बांबोळी येथे नेत असतांना त्याचे निधन झाले. मात्र, त्याने आत्महत्येपुर्वी बनवलेल्या व्हिडिओच्या अनुषंगाने नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत जबाब घेण्याची प्रक्रिया सुरू होती.

बांदा शहरात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात आफ्ताफ शेख याचा फुल विक्रीचा व्यवसाय होता. बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याने राहत्या घरात पंख्याला गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या पत्नीने आरडा ओरड करत घराच्या वरच्या मजल्यावर राहणारा तिचा दिर अब्दुल रझाक याला बोलावून आणले. त्याने खाली येत दरवाजा तोडला व आतमध्ये जात आफ्ताफ याला गळफासावरुन खाली काढले. त्याला तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता हलविले. तेथे उपचार केल्यानंतर त्याला अधिक उपचाराकरिता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविले. तेथून अधिक उपचाराकरिता गोवा बाबुंळी येथे हलवित असतांना त्याचे निधन झाले.

याच दरम्यान त्याने आत्महत्येच्या आधी केलेला व्हिडीओ नातेवाईकांच्या हाती लागला. त्यात त्याने काही जणांची नावे घेत आपल्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. यानंतर त्याठिकाणी असलेल्या आफ्ताफ याचा भाऊ अब्दुल रझाक याच्यासह नातेवाईकांनी संबंधितांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भुमिका घेतली.

याबाबत पोलिसांपर्यंत माहिती पोहोचताच पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांच्यासह बांदा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे तसेच सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, प्रमोद उपनिरीक्षक प्रमोद पाटील याच्यासह टीमने रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांचे म्हणणे जाणून घेतले.

यावेळी तौकीर शेख, ॲड. शमीउल्ला ख्वाॅजा, बांदा उपसरपंच जावेद खतिब, रफिक मेमन,आसिफ शेख,ॲड. संदिप निंबाळकर, वंचित बहूजनचे महेश परुळेकर, मौसिम मुल्ला, आदी उपस्थित होते.

दरम्यान, सायंकाळी सात वाजता पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी उपस्थितांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात बांदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे. घटनेचा रितसर पंचनामा झाला नसताना कोणावरही गुन्हा दाखल करणे संयुक्तिक ठरणार नाही, रीतसर पंचनामा केल्यानंतर चौकशीमध्ये जे निष्पन्न होईल त्यानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करू, तुमच्यावर अन्याय केला जाणार नाही त्यामुळे आपण मृतदेहाची विटंबना न करता तो ताब्यात घ्या अशी विनंती केली मात्र नातेवाईक आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने अखेर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांच्या उपस्थितीत नातेवाईकांचा जाब जबाब घेण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली.