वाहतुकीसाठी रस्ता सुरळीत करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार!
सावंतवाडी । प्रतिनिधी : दक्षिण कोकणचे ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव येत्या ६ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि ‘लोटांगणाची’ आगळीवेगळी जत्रा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या या उत्सवासाठी देवस्थान कमिटीकडून ग्रामस्थांच्या मदतीने युद्धपातळीवर जय्यत तयारी सुरू आहे.
या जत्रोत्सवाला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक भक्त आणि वाहने येत असल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यावर यंदा विशेष भर दिला जात आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी व झुडपे बाजूला करून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करण्याचे महत्त्वाचे काम ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन हाती घेतले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने गेल्या चार-पाच दिवसांपासून हे काम सुरू असून, स्थानिक ग्रामस्थांनी यात सक्रिय सहभाग दर्शविला आहे. जत्रोत्सवादरम्यान कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये आणि भाविकांना अडचण येऊ नये, यासाठी देवस्थान कमिटी विशेष काळजी घेत आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस प्रशासनालाही कळविण्यात आले आहे.
*विस्तृत पार्किंग आणि पावसाच्या अनुषंगाने नियोजन*
सद्यस्थितीत मंदिर परिसराची साफसफाई, विद्युत रोषणाई आणि मंडप व्यवस्था अशी कामे वेगाने सुरू आहेत. भाविकांची वाढती संख्या आणि वाहनांची गर्दी लक्षात घेऊन यावर्षी पार्किंग व्यवस्थेवरही खास लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
शिवाय, यंदाच्या जत्रोत्सवावर काहीसे पावसाचे सावट असल्याने, तशा प्रकारची आवश्यक उपाययोजना करण्याचे नियोजनही देवस्थान कमिटीने केले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चोख आणि निर्विघ्न नियोजन करून जत्रोत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी देवस्थान कमिटीने कंबर कसली आहे. एकूणच, या ऐतिहासिक जत्रोत्सवाची ओढ परिसरातील आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांना लागून राहिली आहे.













