डोक्याला गंभीर दुखापत ; दोघांवार गुन्हा दाखल
सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील मँगो हॉटेलच्या आवारात असलेल्या कॅफे मालकावर काही जणांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री सुमारे १०.३० ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. या हल्ल्यात कॅफे मालक मौहसीन शब्बीर तांबोळी (रा. कोलगाव दरवाजा, वैश्यवाडा, सावंतवाडी) गंभीर जखमी झाला असून, त्याला तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ओमकार गावकर आणि सोहेल मुजावर (दोन्ही रा. सावंतवाडी) हे चारचाकी वाहनातून मँगो हॉटेलच्या आवारात आले होते. त्यावेळी त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडताना तो दरवाजा फिर्यादी मौहसीन तांबोळी यांना लागला. याबाबत त्यांनी दोघांना विचारणा केली असता आरोपींनी संतापून डस्टबिनच्या डब्याने तांबोळी यांच्या डोक्यावर प्रहार केला. तसेच लाथाबुक्क्यांनी आणि हाताच्या थपडा मारून मारहाण केली व शिवीगाळ केली.
या हल्ल्यात मौहसीन तांबोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, सात टाके पडले आहेत. जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध सावंतवाडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार महेश जाधव करीत आहेत.













