सावंतवाडी । प्रतिनिधी : ‘प्राणजीवन सहयोग संस्था, शिरवल’ आयोजित आणि संस्थाध्यक्ष संदिप चौकेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी येथे आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सुश्रुत मंदार नानल यांनी ‘खुला गट’ जिंकून विजेतेपद पटकावले.
या विशेष दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने दिवसभर विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायत हळवल येथे मोफत आरोग्य शिबिर, कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप, करंजे येथील गोवर्धन गोशाळेत गोचारा प्रदान, पणदूर येथील सविता वृद्धाश्रमात स्नेहभोजन व भेटवस्तू वाटप, तसेच रोणापाल येथील दयासागर छात्रालयात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या सर्व उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कळसुलकर हायस्कूलमध्ये झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळा आणि संस्थांमधून शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही संपूर्ण स्पर्धा कोल्हापूर येथील पंच मनिष मारुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्विस लीग’ अंतर्गत यशस्वीरीत्या पार पडली. स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडूंनीही सहभाग घेतला होता.
*स्पर्धेतील विविध गटांचे निकाल खालीलप्रमाणे लागले:*
खुला गटात सुश्रुत मंदार नानल (पहिले बक्षीस), बाळकृष्ण पेडणेकर (दुसरे) आणि संदिप धुरी (तिसरे) यांनी यश मिळवले. जेष्ठ खेळाडू गटात भिसाजी तानावडे, बळीराम आडेलकर आणि निळकंठ मणेरीकर हे अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे विजेते ठरले. १६ वर्षाखालील गटात यथार्थ मंगेश डांगी याने पहिले स्थान पटकावले, तर प्रतीक देसाई आणि रुद्रा मोबारकर यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे बक्षीस जिंकले. महिला गटात गार्गी किरण सावंत (पहिले बक्षीस), भूमी कामत (दुसरे) आणि तनिष्का आडेलकर (तिसरे) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. सावंतवाडी उत्कृष्ट खेळाडू म्हणून विराज दळवी, हर्ष राऊळ आणि पार्थ गावकर यांना गौरविण्यात आले. प्रत्येक गटातील पहिल्या दहा विजेत्यांना प्रमाणपत्रे, ट्रॉफी आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी बोलताना संस्थाध्यक्ष श्री. संदिप चौकेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “बुद्धिबळ हा खेळ केवळ मोहर्यांचा नाही, तर संयम, विचारशक्ती आणि निर्णयक्षमता विकसित करणारा जीवनाचा धडा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांमध्ये या खेळाबद्दलची आवड वाढावी, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.” त्यांनी यशस्वी उपक्रमांबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्कार नॅशनल स्कूलचे चेअरमन शेखर जैन आणि कळसुलकर स्कूलचे संचालक शैलेश पई यांची प्रमुख उपस्थिती होती. बक्षीस वितरणावेळी संदिप चौकेकर यांच्यासह ऑन-कॉल रक्तदाते बाबली कृष्णा गावडे, जेष्ठ खेळाडू भिसाजी तानावडे, चंद्रकांत रणशूर, पंच मनिष मारुलकर, परीक्षक राजेंद्र तवटे, सुयोग धामापुरकर, आणि संस्थेचे उपाध्यक्ष स्वप्नील पुजारे तसेच इतर प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गौरवी घाटे यांनी केले, तर आयोजन गितेश शेणई आणि श्रीकांत तानावडे यांनी उत्कृष्टपणे पार पाडले.
या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.












