सावंतवाडी : कोलगाव येथे एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिलेला गंभीर दुखापत झाली त्यानंतर परिसरातील नागरिकांनी संतप्त होऊन अपघातग्रस्त कार जप्त केली आणि पोलिसांना पाचारण केले.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलगाव येथील रस्त्यावर दारूच्या नशेत असलेल्या कार चालकाने नियंत्रण गमावल्यामुळे दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील महिला रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाली.
अपघाताच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणारे सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ वकील ॲड. बापु गव्हाणकर यांनी माणुसकी दाखवत तातडीने जखमींच्या मदतीला धाव घेतली. त्यांनी स्वतःच्या कारमधून जखमी महिलेला तात्काळ सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या या तत्पर मदतीमुळे जखमी महिलेला वेळेवर वैद्यकीय उपचार मिळू शकले.
अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. मद्यधुंद अवस्थेतील चालकाच्या या कृत्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी संबंधित कार घटनास्थळीच जप्त केली आणि पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या अपघातामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे वाहतुकीत काही काळ अडथळा निर्माण झाला होता. वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.













